पेनड्राईव्ह बॉम्बमुळे इतर खटल्यांबाबतही संशय कल्लोळ !

1

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार सत्तेचा वापर करून महाराष्ट्रातील भाजप पक्ष संपविण्याचा कट करीत असल्याचा व्हीडीओ ऑडीओ क्लिपच्या पुराव्याद्वारे केले. त्या स्टिंग ऑपरेशन पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना देवून त्यातील काही व्हिडीओ सभागृहात वाचून दाखवल्या. यात मुख्यत: माजी मंत्री गिरीश महाजन यांना खोट्या केसमध्ये मोक्का लावण्याचा कट सरकारी वकिल ॲड. प्रविण पंडित चव्हाण यांच्या मदतीने आणि तपासी पोलिसांच्या सहकार्याने कसा रचला गेला त्याचा थोडक्यात पर्दाफाश केला.

माजी मंत्री गिरीश महाजन हे फडणविस यांचे विश्‍वासू आणि निकटवर्तीय आहेत. थोडक्यात त्यांना वाचण्यासाठी हा कथित पेनड्राईव्ह आहे. जळगावातील नूतन मराठा शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था ताब्यात घेण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड. विजय पाटील यांना पुण्यात एका हॉटेलमध्ये बोलावून मारहाण करून संस्थेची कागदपत्रे ताब्यात घेण्याचा प्रयत्न गिरीश महाजनांनी त्यांच्या हस्तकांनी केला अशी फिर्याद तीन वर्षानंतर जळगावच्या निंभोरा पोलिस स्टेशनला दाखल केला. तो नंतर पुणे येथील पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आला. पुणे पोलिसांनी या फिर्यादीची दखल घेवून भोईटे गट आणि गिरीश महाजनसह त्यांचे स्वीय सहाय्यक रामेश्वर नाईक यांचेवर गुन्हा दाखल करून कारवाई केली. गुन्ह्याप्रकरणी भोईटे गटाच्या काही जणांच्या घरावर धाडी टाकून कागदपत्रे जप्त केली. भोईटे गटाच्या 7 जणांवर मोक्का लावण्यात आला. गिरीश महाजन यांचेवरही मोक्काची कारवाई केली. परंतु कोर्टाने त्यांना दिलासा दिला.

हे प्रकरण जळगाव जिल्ह्यात फार संवेदनशील आणि खळबळजनक बनले होते. यात सरकारी पक्षाचे वकिल म्हणून ॲड. प्रविण पंडित चव्हाण हे काम पहात आहेत. ॲड. प्रविण चव्हाण हेच जळगाव नगरपालिकेचे घरकुल घोटाळ्यात सरकारी वकिल होते. जळगाव जिल्ह्याचे नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन, प्रदिप रायसोनी, गुलाबराव देवकर आदिसह अनेक आजी-माजी नगरसेवक आरोपी होते. या खटल्यात बहुतेक सर्वांना कोर्टाने शिक्षा ठोठावली. सुरेशदादा जैन यांना सुप्रिम कोर्टाने या शिक्षेला अंतरिम जामीन दिला आहे. जळगाव येथील बीएचआर मल्टीस्टेट पतसंस्थेतील भ्रष्टाचार खटल्यातही ॲड. प्रविण चव्हाण हेच सरकारी वकिल होते. तोही खटला जळगाव जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात गाजला.

देवेंद्र फडणवीस यांनी जो पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना दिला तो 125 तासांचा असल्याचे सांगण्यात येते. त्यात त्यांनी खटल्यातील सरकारी वकिल ॲड. प्रविण चव्हाण यांनी पोलिसांकडून खोट्या साक्षी व पुरावे कशारितीने केले त्याचा पर्दाफाश केला. सरकारी वकिल प्रविण चव्हाण हे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत होते, असाही आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. गिरीश महाजन आणि एकनाथराव खडसे यांचे राजकीय वैर सर्वश्रूत आहे. त्याचा बदला खडसेंना यानिमित्ताने घ्यायचा होता असाही आरोप फडणविसांनी केला. सरकारी वकिल प्रविण चव्हाण आणि एकनाथराव खडसे यांचेवर फडणविसांनी रोष व्यक्त केला. त्यामुळे सरकारी वकिल प्रविण चव्हाण यांच्या कामकाजासंदर्भात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

एक खरे आहे की, ॲड.प्रविण चव्हाण हे माध्यमातून खटल्यासंदर्भात सनसनाटी निर्माण करण्यात माहिर आहेत. घरकूल घोटाळ्याच्या खटल्यात दररोज वृत्तपत्रांमध्ये रकानेच्या रकाने बातम्या प्रसिध्द व्हायच्या ॲड.चव्हाण यांना प्रसिध्दीचा एवढा हव्यास कशासाठी. सुरेशदादा जैन आणि खडसे यांचेसुध्दा राजकीय वैर सर्वांना माहित आहे. त्यामुळे खडसे आणि ॲड.चव्हाण यांचे संबंध जवळचे आहेत हे दिसून येते. परंतु विशेष म्हणजे घरकूल घोटाळा खटल्याचे वेळी स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. त्यावेळी सरकारी वकिल प्रविण चव्हाण हेच होते. त्यावेळी ॲड. प्रविण चव्हाण आणि खडसे यांचेविषयी त्यांना काही जाणवले नाही का? जळगाव जिल्ह्यातील ज्या ज्या खटल्याचे कामकाज प्रविण चव्हाण यांनी पाहिले आहे. त्याबाबत लोकांच्या मनात एक प्रकारचा संशयकल्लोळ निर्माण होणे साहजिकच आहे. जोपर्यंत या पेनड्राईव्हची शहानिशा होणार नाही तोपर्यंत सरकारी वकिल प्रविण चव्हाण यांच्याकडे संशयाची सुई राहणार आहे.

1 Comment
  1. Dharmendra Badgujar sir says

    सुरेश दादा जैन यांच्यावर ज्या पद्धतीने केस दाखल करून सत्य उकरून काढले . a त्यांना शिक्षा दिली . तेहा कोणीच बोलले नाही व आताच त्यांच्यावर संशयाची सुई कशासाठी ?

Leave A Reply

Your email address will not be published.