अंतर्गत वादाचा विजयात अडथळा नको !

फडणवीसांचा महायुतीच्या नेत्यांना निर्देश

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. तर दुसरीकडे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे यांच्या विरोधात राम शिंदे यांनी भूमिका घेतल्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील वाद पक्ष पातळीवर सोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे वाद मिटवण्यासाठी स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. मात्र, तरी वाद मिटताना दिसत नसल्याचे पाहून अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून महायुतीचे काम करा, अंतर्गत मतभेदाचा परिणाम ‘मिशन 45’ प्लस वर होता कामा नये, असे निर्देश भाजपा नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात थेट आघाडी उघडली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम महायुतीवर होत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या संदर्भातच चर्चा सुरू असताना भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनीही अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील नाराज आहेत. हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांची एकत्र बैठक घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांमधील वाद कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या बैठकीनंतरही हर्षवर्धन पाटील यांचे समाधान झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या विषयी कोणतेही मत मांडण्यास हर्षवर्धन पाटील यांनी नकार दिला आहे. ही बैठक सुमारे दोन तास सुरू होती. मात्र, तरीही वाद मिटला की नाही, याबाबत माहिती समोर आलेली नाही.

फडणवीसांनी दिला नेत्यांना समज

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघांमध्ये राम शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. राम शिंदे आणि विखे पाटील यांच्यातील वाद मिटवण्यासाठी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये सर्व नेत्यांनी महायुतीचा उमेदवार विजयी होईल, बाकी सर्व बाजूला ठेवा, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात संकेत दिले आहेत. अंतर्गत वादामुळे महायुतीच्या उमेदवारास परिणाम होता कामा नये, अशी समज देवेंद्र फडणवीस यांनी सर्व नेत्यांना दिली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.