चक्क पतीनेच केले पत्नीचे अपहरण ; पोलिसांनी घेतले ताब्यात

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पुणे ;पतीनेच केले पत्नीचे अपहरण.खराडी येथील मारवेल झपायर सोसायटीसमोर पतीने चारित्र्याच्या संशयातून त्याच्या इतर दोन साथीदारांना सोबत घेऊन हे अपहरण केल्याचे तपासात समोर आले आहे. पत्नीचे अपहरण करून तिला कारमधून घेऊन जाणार्‍या पतीसह तिघांना चंदननगर पोलिसांनी फलटणजवळ ताब्यात घेतले.

अमोल देवराव खोसे (वय 24, रा. रोहिणा, ता. परतूर, जि. जालना), महादेव निवृत्त खानापुरे (वय 22, रा बामणी, ता. परतूर, जि. जालना) आणि ज्ञानेश्वर बबन पांजगे (वय 25, रा. परतूर, जि. जालना) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी खराडी येथे राहणार्‍या 26 वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना खराडी येथील मारवेल झपायर सोसायटीसमोर बुधवारी मध्यरात्री 12 वाजता घडली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांनी सांगितले की, फिर्यादी महिला ही पतीपासून वेगळी राहत आहे. फिर्यादी या रात्री कामानिमित्त पायी जात होत्या. त्या खराडीतील मारवेल झपायर सोसायटीसमोर आल्या असताना कारमधून आरोपी आले. त्यांनी जबरदस्तीने फिर्यादीला कारमध्ये बसविले. मात्र वेळीच प्रसंगावधान राखत महिलेने रस्त्यावरून निघालेल्या एका व्यक्तीकडे आपला मोबाईल फेकून दिला.

त्याला आपल्याला पळवून नेले जात असल्याचे ओरडून सांगून पोलिसांना कळविण्यास सांगितले. आरोपींनी तिचे हात-पाय बेल्टने बांधून, आज तुला जिवंत सोडणार नाही, आज तुझा शेवटचा दिवस आहे, असे धमकावून जबरदस्तीने पळवून नेले.

मोबाईल घेणार्‍या नागरिकाने ही बाब तातडीने चंदननगर पोलिसांना सांगितली. चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जाधव, पोलिस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक रामेश्वर रेवले, दिलीप पावले, कर्मचारी सचिन कुटे, विक्रांत सासवडकर, सुभाष आव्हाड, संदीप येळे यांच्या पथकाने तातडीने या महिलेचा शोध सुरू केला.

तेव्हा ही कार फलटणच्या दिशेने जात असल्याची त्यांना माहिती मिळाली. चंदननगर पोलिसांचे पथक तातडीने तिकडे रवाना झाले व त्यांनी कारचा शोध घेऊन या महिलेची सुटका केली व तिघांना ताब्यात घेतले. अपहरण झाल्यानंतर केवळ 6 तासांत तिघांना पोलिसांनी अटक केली.

आरोपी पती हा मूळचा परतूर तालुक्यातील रोहिणा गावचा आहे. तो पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत होता. त्यातूनच त्याने दोन दिवसांपूर्वी पत्नीचे अपहरण करण्याची योजना आखली. त्यासाठी तो गाडी व त्याचे दोन साथीदार घेऊन पुण्यात आला. पत्नीला काम मिळवून देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. संधी मिळताच गाडीत डांबून तिचे अपहरण केले.

Leave A Reply

Your email address will not be published.