सोमय्यांचा ‘टॉयलेट घोटाळा’ लवकरच बाहेर काढणार – संजय राऊत

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुंबई ; “विक्रांत नंतर आता टॅायलेट घोटाळा बाहेर काढणार” असा सूचक इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलत असताना दिला. मिरा-भाईंदर महापालिका आणि महाराष्ट्रात इतरत्र काही ठिकाणी कोटींचा ‘टॉयलेट घोटाळा’ झाला आहे. तसेच याबाबतचे सर्व कागदपत्र सुपूर्द झालेली आहे, असा दावा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

युवा प्रतिष्ठान नावाची जी एनजीओ चालवत होते, ही लोकं. त्यांनी शेकडो कोटी रुपयांचा ‘टॉयलेट घोटाळा’ केला आहे. खोटी बिलं, पर्यावरणाचा ऱ्हास करुन पैसे काढले. हा घोटाळा लवकरच बाहेर येईल. आता तुम्ही फक्त खुलासे करत बसा, असं संजय राऊत म्हणाले. तसेच या सर्व विषयांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला हवं, असं आवाहनही संजय राऊतांनी यावेळी केलं. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळे ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काल १४ ट्विट केले. आता त्यांनी विक्रांत, टॉयलेट, घोटाळा यावर ट्विट करावं, असं संजय राऊतांनी सांगितलं. तसेच आमच्यावर घोटाळ्याचे आरोप केले, आमच्यावर फुसके बार उडवले, अशी टीकाही संजय राऊत यांनी भाजपावर केली.

गेल्या काही काळापासून सतत काही लोकांना दिलासा मिळत आहे. घोटाळा करणाऱ्या आरोपींना एका रांगेत सगळ्यांना दिलासे कसे मिळतात, न्यायव्यवस्थेवर कोणाचा दबाव आहे का? न्यायव्यवस्थेवर विशेष असे लोक बसवण्यात आले आहेत का? आणि ते कोणाचं सूचनेनुसार काम करतात का? असे विविध प्रश्न संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केले.

ठाकरे कुटुंबाशी संबंधित आणखी एका कंपनीचा घोटाळा बाहेर काढण्याचा इशारा काल (गुरुवारी) पत्रकार परिषदेत बोलताना भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी दिला आहे. आज दुपारी एक वाजता किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी डर्टी डझन मंत्री म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य करणारे किरीट सोमय्या आज कोणता गौप्यस्फोट करणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

‘INS विक्रांत’ ही युद्धनौका भंगारात जाऊ नये म्हणून किरीट सोमय्यांनी सर्वसामान्य नागरिकांकडून ५८ कोटी रुपये गोळा केले आणि नंतर मुलगा नील सोमय्या यांच्या कंपनीमार्फत मनी लॉण्ड्रिंग केले, असा आरोप शिवसेन नेते संजय राऊत यांनी केला होता. राऊत यांच्या या आरोपानंतर माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.