नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:
देशातील सहा राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे चिंतेत असलेल्या केंद्र सरकारच्या आरोग्य सचिवांनी सहा राज्यांना पत्र लिहिले आहे. पत्रात असे म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांत कोविडच्या प्रकरणांमध्ये घट झाली होती, परंतु गेल्या एक आठवड्यापासून प्रकरणांमध्ये अचानक वाढ होत आहे.
अशा परिस्थितीत राज्य सरकारांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर नियंत्रण ठेवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. ज्या सहा राज्यांना पत्र लिहिले आहे त्यात महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक यांचा समावेश आहे. आरोग्य सचिवांनी पत्रात म्हटले आहे की 15 मार्चपर्यंत प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. राज्य सरकारांनी चाचणी, उपचार, ट्रॅक, लसीकरणाचा आग्रह धरला पाहिजे.
गुरुवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, चार महिन्यांच्या कालावधीनंतर, एका दिवसात 700 हून अधिक कोविड प्रकरणे नोंदवली गेली, ज्यामुळे सक्रिय प्रकरणांची संख्या 4,623 झाली. गेल्या वर्षी 12 नोव्हेंबर रोजी देशात 734 प्रकरणे नोंदवली गेली होती.