बच्चू कडू यांची पक्ष विस्तारात कसोटी लागेल?

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

गरिबांसाठी, दीन दुबळ्यांसाठी लढणाऱ्यांमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आ. बच्चू कडू यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. महाराष्ट्रात विदर्भातील अचलपूर मतदारसंघातून आमदार म्हणून गेले तीन वेळा ते निवडून येतात. आमदारकीच्या पहिल्या निवडणुकीत तर ते अपक्ष म्हणून जनतेकडून एक एक रूपया

निधी गोळा करून मतदारांनी त्यांना आमदार म्हणून निवडून दिले. 2014 च्या विधानसभा

निवडणुकीसाठी ते लोकांच्या पैशातूनच निवडून आले. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी प्रहार जनशक्तीतर्फे स्वत: व आणखी एक आमदार निवडून आले. आ. बच्चू कडू आमदार म्हणून राजकारणात आले असले तरी राजकारणाचा उपयोग ते सेवाभाव म्हणून  करीत आहेत.

अपंगांसाठी ते सातत्याने लढा देत आहेत.  शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी ते सातत्याने सरकारच्या विरोधात आवाज उठवतात. गोरगरीब वंचितांचे ते मसिहा म्हणून ओळखले जातात. 2019 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना या घटक पक्षांकडून मंत्रीमंडळात शिक्षण राज्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे. मंत्रीमंडळात राज्यमंत्री असलेल्या बच्चू कडूंची प्रतिमा अगदी रस्त्यावरचा माणूस अशी आहे.

बच्चू कडूंच्या विरोधात निवडणुक लढविण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून उमेदवार देतांना फार मोठी पंचाईत होते. अशा बच्चू कडूंची प्रतिमा महाराष्ट्रात सर्वदूर पसरली आहे. 2019 च्या निवडणुकीत त्यांचेसह दोन आमदार अशी संख्या झाली आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यामुळे त्यांचा नावलौकिक पुन्हा वाढला. त्याचा परिणाम त्यांनी स्थापन केलेल्या प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची जणू रीघ लागली आहे.

बच्चू कडूंच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे स्वार्थी हेतूने त्यांचा पक्षात प्रवेश घेणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या विदर्भासह महाराष्ट्रात इतरत्र वाढत असली तरी बच्चू कडूंनी या पक्ष विस्तारामुळे अथवा वाढीमुळे हुरळून जाऊ नये असे आम्हाला वाटते. कारण बच्चू कडूंचे राजकारणामागे सेवाधर्म आहे. परंतु आजकाल राजकारणाचा फायदा निवडून येणारे राजकारणी कशा पध्दतीने घेतात याकडे पाहिले की, बच्चू कडूंच्या तत्वात ते कदापि बसणारे नाही. महाराष्ट्र प्रहार जनशक्ती पक्षाच्या विस्ताराच्या बातम्या ऐकायला वाचायला मिळतात.

आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढतेय. पक्षाचा विस्तार होणे प्रत्येकाला हवे असते. तसे – बच्चू कडूंनाही वाटणे साहजिक आहे. परंतु पक्ष विस्ताराच्या बजबजपुरीमुळे बच्चू कडूंची प्रतिमा मलिन होणार नाही याची काळजी त्यांना घेणे आवश्‍यक आहे. अन्यथा ते कमावले ते गमावले जाणार नाही याची  दक्षता घेणे गरजेचे आहे. म्हणून प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश घेतांना बच्चू भार्इं कसोटी लावून प्रवेश देतील, अशी अपेक्षा आहे.

जळगाव जिल्ह्यातही प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर झाली. जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र महाजन, युवक जिल्हाध्यक्षपदी अविनाश पाटील,  शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील तसेच पक्षाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय प्रमुख म्हणून भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांची निवड झाल्याचे जाहीर झाले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख अनिल चौधरी यांचे नेतृत्वात नुकतीच पत्रकार परिषद घेण्यात आली.

त्या पत्रकार परिषदेचा रोख आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा संदर्भात होता. प्रहार जनशक्ती पक्षातर्फे जि.प., पं.स. नगरपालिकेत स्वतंत्र्यपणे उमेदवार उभे केले जातील असे सांगण्यात आले. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुक पक्षाचे लक्ष्य असेल असे सांगण्यात आले. रावेर विधानसभा मतदार संघातील आजी-माजी लोकप्रतिनिधींवर टीका करतांना विकासाचे राजकारण करण्याऐवजी टक्केवारीचे राजकारण करण्यात गुंतल्याचा आरोप पत्रकार परिषदेत अनिल चौधरींसह सर्वच पदाधिकाऱ्यांनी केला.

त्याचबरोबर जाती-जातीत, धर्मा-धर्मात भांडणे लावण्याचे काम या मंडळीने केले. त्यामुळे रावेर मतदार संघात जातीय दंगली होतात. त्यासाठी आम्हाला हे राजकारण मोडून काढायचे आहेत. राजकारणाचा उपयोग सेवा म्हणून करणार आहोत. एका पदाधिकाऱ्यांने सांगितले गेल्या 30 वर्षात भुसावळ शहरात जातीय दंगल झालेली नाही याचे श्रेय भुसावळ शहरातील संतोष चौधरी, अनिल चौधरी यांच्या परिवाराला द्यावे लागेल.

तशा पध्दतीचे राजकारण रावेर मतदार संघात करण्यात येईल, असे पत्रकारांना सांगण्यात आले. हे सर्व करत असतांना आजी-माजी लोकप्रतिनिधींनी जाती-जातीत, धर्मा-धर्मात भांडणे लावण्याचे काम केले हे आरोप मागील राजकारण मात्र न पटणारे आहे. कारण माजी आमदार स्व.हरिभाऊ जावळे यांना रावेर मतदार संघातील मतदारांनी दोन वेळा निवडून दिले दोन वेळा ते खासदार झाले. कै.हरिभाऊ जावळे ज्या भाजपत होते त्याच पक्षात अनिल चौधरी होते. त्यामुळे या त्यांच्या आरोपात तथ्य नाही.

त्याच बरोबर विद्यमान आमदार काँग्रेसचे शिरीष चौधरी यांना सुध्दा या मतदार संघातील जनतेने दोन वेळा निवडून दिलेले आहे. ते काँग्रेसचे असल्यामुळे दलित – मुस्लिम समाज त्यांचे मतदार आहेत. त्यामुळे जाती-धर्मात भांडणे लावण्याचे कृत्य आ.शिरीष चौधरी कडून मुळीच होणे शक्य नाही. तसेच त्यांना जो कै.बाळासाहेब चौधरींचा सेवेचा वारसा लाभलेला आहे. त्यांची तुलना भुसावळ चौधरी बंधूच्या सेवेशी होवू शकत नाही. कारण भाजपत असलेले अनिल चौधरींनी भाजपचे तिकीट मिळाले नाही.

म्हणून पक्षाशी बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली त्याचा परिणाम भाजपचे अधिकृत उमेदवार कै.हरिभाऊ जावळे यांचा पराभवात झाला हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे रावेर मतदार संघातील जनतेला याची सर्व माहिती आहे. त्यामुळे बच्चू कडूच्या सेवाभावी राजकारणावर काम करणे तशी अवघड बाब आहे हेच यानिमित्ताने सुचवावे वाटते.

Leave A Reply

Your email address will not be published.