अॅड.उज्वल निकम यांना भाजप गळाला लावण्यात यशस्वी..!

0

लोकशाही संपादकीय लेख 

मूळ जळगावचे असलेले अॅड. उज्वल निकम यांनी आपल्या वकिली पेशात विशेष असा नावलौकिक निर्माण केला आहे. जळगावच्या कोर्टात त्यांनी आपल्या वकिली व्यवसायाला सुरुवात करून सहकार क्षेत्राबरोबरच गुन्हेगारी क्षेत्रात आपला विशेष ठसा उमटविला. जळगाव जिल्हा सरकारी वकील म्हणून त्यांनी अनेक वर्ष चांगली कामगिरी पार पाडली. त्यांच्या गुन्हेगारी क्षेत्रातील सखोल अभ्यासामुळे अनेक खटले ते जिंकले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कुठेही गुन्हेगाराकडून कुणावर अत्याचार झाला, तर अॅड. उज्वल निकम यांना विशेष सरकारी वकील म्हणून नेमण्याची मागणी होऊ लागली. महाराष्ट्र शासनाने ज्या ज्या खटल्यात त्यांची नियुक्ती केली त्या खटल्याचा निकाल फिर्यादींच्या बाजूने लागले. गेल्या पंधरा-वीस वर्षापासून महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेवर आले, तर त्या सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्वल निकम यांनाच कायमच ठेवले. पाकिस्तानने मुंबईवर केलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील खटल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाबच्या विरोधात खटला त्यांनीच लढवला. आरोपी कसाबला फाशीची शिक्षा कोर्टाने सुनावली. त्या खटल्यामुळे अॅड. उज्वल निकम यांना आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध मिळाली. त्यानंतर भारत सरकारने ‘पद्मश्री’ देऊन त्यांचा गौरव केला.

अॅड. उज्वल निकम राजकारणात प्रवेश करतील असे जळगावकरांना वाटत होतेच. कारण गेल्या २०१४ लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर त्यांना दिली गेली होती. तथापि विनम्रपणे त्यावेळी त्यांनी शरद पवार यांची ऑफर नाकारली होती. परंतु २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबईतून त्यांना भाजपने उमेदवारी देण्यात यश मिळवले आहे. जळगाव लोकसभेसाठी अॅड. उज्वल निकम यांचे पुतणे रोहित निकम यांनी भाजपतर्फे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पुतणे रोहित निकम यांना तर भाजपने उमेदवारी दिली नाही, परंतु त्यांचे काका अॅड. उज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईच्या लोकसभेची उमेदवारी दिली आहे. वास्तविक उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघात भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन २०१४ आणि २०१९ ला दोन वेळा निवडून आल्या होत्या. तिसऱ्यांदा त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल असे वाटत होते. परंतु पूनम महाजन यांची उमेदवारी रद्द करून अॅड. उज्वल निकम यांना उमेदवारी देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. दोन दिवसांपासून अॅड. उज्वल निकम यांना मुंबईतून भाजपकडून उमेदवारी देऊन त्यावर शिक्कामोर्तब केला. आता उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध अॅड. उज्वल निकम असा सामना होणार आहे.

जळगावचे मूळ रहिवासी अॅड. उज्वल निकम हे आता उत्तर मध्य मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढविणार आहेत. वकिली व्यवसायात नावलौकिक कमावणाऱ्या अॅड. उज्वल निकम यांची राजकीय कारकीर्द कशी राहील याकडे सर्वांचे विशेष लक्ष राहील. ते जरी जळगावचे असले तरी त्यांचे क्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रभर असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ते परिचित आहेत. मुंबईमध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात तसेच विशेष कोर्टात त्यांचे सतत कामकाज असल्यामुळे मुंबईकर सुद्धा त्यांना परिचित आहेत. अलीकडे तर मुंबई हीच त्यांची कर्मभूमी झाली आहे. जळगावला ते शनिवार आणि रविवारीच येतात. बाकी आठवडाभर ते मुंबईला असतात. प्रसार माध्यमांशी त्यांचा सातत्याने संबंध येतो. मुद्रित वृत्तपत्रे, टीव्ही चॅनल्स आणि सोशल मीडियावर सतत कुठे ना कुठे अॅड. उज्वल निकम यांचे नाव झळकत असते. आपल्या वकिली व्यवसायातील लोकप्रियतेचा पक्षीय राजकारणात कितपत उपयोग याची जणू ही उत्तर मुंबई लोकसभा निवडणूक एक प्रकारे परीक्षाच म्हणावे लागेल.

अॅड. निकम हे महायुतीचे उमेदवार असल्यामुळे भाजप सह महायुतीच्या शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्यांना निवडणुकीत साथ मिळणार आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्राच्या माजी मंत्री वर्षा गायकवाड या महाविकास आघाडीच्या उमेदवार असून, त्या मुळच्या मुंबईच्या रहिवासी आहेत. मुंबईमध्ये मंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य सुद्धा प्रशंसनीय आहेत. त्यांचा मुंबईला सामान्य जनतेशी थेट संबंध आलेला आहे. ही त्यांची जमेची बाजू म्हणता येईल. तसेच महाविकास आघाडी काँग्रेससह शिवसेना उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांना निवडणुकीत साथ मिळणार आहे. वर्षा गायकवाड यांचे वडील राजकारणात होते. त्यांना जसा राजकारणाचा वारसा आहे; तसा एड अॅड. उज्वल निकम यांचे वडील सुद्धा राजकारणात होते. त्यामुळे त्यांनाही थोडा राजकीय वारसा आहे. दरम्यान आता उत्तर मध्य मुंबईत अॅड. उज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड यांच्यातील सामना रंगणार आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.