रावेर लोकसभा प्रचारात वडील कन्येपैकी प्रभावी कोण..?

0

लोकशाही संपादकीय लेख 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात रंगत आली आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी माघार घेण्याची काल अंतिम तारीख होती. जळगाव मधून ६ अपक्षांनी माघार घेतली. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह १४ उमेदवार रिंगणात आहेत. तर रावेर लोकसभा मतदारसंघातून ५ अपक्षांनी माघार घेतल्याने महायुती विकास आघाडी आणि बहुजन समाज पार्टीसह एकूण २४ उमेदवार रिंगणात आहेत. असे असले तरी जळगाव मधून महायुतीच्या स्मिता वाघ आणि महाविकास आघाडीचे ठाकरे शिवसेनेचे करण पवार यांच्या आणि रावेर मध्ये महायुतीच्या खासदार रक्षा खडसे आणि महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे श्रीराम पाटील यांची खरी लढत आहे.

करण पवार यांनाही शिवसेनेत घेऊन शिवसेनेची उमेदवारी दिल्याने समीकरण बदलण्याची चित्र दिसत आहेत. रावेरमध्ये रक्षा खडसेंना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन ‘रक्षा खडसेंना यंदा तिकीट मिळणार नाही’ म्हणणाऱ्या भाजपच्या काहींना चपराक दिली आहे. खासदार रक्षा खडसेंची भाजप तर्फे उमेदवारी दुसऱ्या यादीतच जाहीर झाल्याने रक्षा खडसेंना गेला महिनाभर प्रचारासाठी वेळ मिळाला. त्यामुळे त्यांनी मतदार संघ त्यांनी पिंजून काढला आहे. महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे (शरद पवार) उमेदवारीचा घोळ चालू होता. अगदी अलीकडे तो घोळ मिटला आहे. आणि पक्षातील इच्छुकांना डावलून भाजपमध्ये दोन महिन्यापूर्वी प्रवेश केलेल्या उद्योजक श्रीराम पाटील यांना राष्ट्रवादीत घेऊन त्यांची उमेदवारी घोषित केली. त्यामुळे एकतर नवखे उमेदवार त्यात उमेदवारी अर्ज दाखल होईपर्यंत त्यांचा प्रचार थंडावला होता. त्यातच माजी मंत्री राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात घरवापसी केल्याने रक्षा खडसे यांना निवडणुकीत त्यांच्या अनुभवाचा तसेच त्यांच्या जनसंपर्काचा फायदा मदत रूप ठरणार आहे.

एकनाथ खडसे यांची भाजपातील घरवापसीला काही कारणास्तव ब्रेक लागला असला तरी भाजपच्या वरिष्ठांनी खडसेंना निवडणूक प्रक्रियेत सामावून घेण्याच्या सूचना दिल्या असल्याने एकनाथ खडसे सून रक्षा खडसेच्या प्रचारात उत्तरले आहेत. नाथाभाऊ जरी रक्षा खडसेंचा प्रचार करीत असले, तरी कन्या रोहिणी मात्र राष्ट्रवादीतच असल्याने त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीराम पाटलांचा जोरदार प्रचार करीत आहेत.

खासदार रक्षा खडसे तसेच रोहिणी खडसे यांचे राजकीय गुरु एकनाथ खडसे हेच असले तरी वडील आणि कन्या यांच्या प्रचारातील वाटा वेगवेगळ्या आहेत. कन्या रोहिणी खडसेचे बोट धरून राजकारणात आणणारे तसेच राजकारणाचे धडे देणारे नाथाभाऊ रोहिणी पेक्षा अनेक पावसाळे जास्तीचे पाहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा सून रक्षा खडसेसाठी मोठा फायदेशीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये नाथाभाऊंचे तिकीट रद्द करून कन्या रोहिणी खडसेंना उमेदवारी दिली, तेव्हा फक्त १८०० मतांनी त्यांचा पराभव झाला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मते सुद्धा तिच्या पाठीशी नाथाभाऊ होते म्हणूनच शक्य झाले. त्यामुळे रोहिणी खडसेंकडून भाजपच्या विरोधात अर्थात भाऊजाई रक्षा खडसेंच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे प्रचारात उतरल्या असल्या तरी वडिलांपेक्षा रोहिणीचा प्रचार प्रभावी राहूच शकत नाही. कालच प्रचारात भाजप विरुद्ध म्हणजे भावजाई रक्षा खडसेंच्या विरोधात जो टीकात्मक प्रचार केला त्या टीकेला जशास तसे उत्तर देऊन रक्षा खडसेंनी पलटवार केला आहे. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात रोहिणी खडसेचा प्रचार प्रभावी ठरणे कठीण आहे. कारण वडील एकनाथ खडसे प्रचारात असताना वडिलांच्या विरोधात रोहिणींना टीका करणे शक्य होणार नाही…!

Leave A Reply

Your email address will not be published.