मोदींनी घेतलेले निर्णय मागे घेण्याची कुणात हिंमत !

पंतप्रधानांचा विरोधकांना सवाल

0

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सत्तेवर आल्यानंतर 370 कलम पुन्हा आणणार असा काँग्रेसचा अजेंडा आहे, पण कुणाच्यात हिंमत आहे का मोदीने घेतलेले निर्णय मागे घेण्याची ? सीएए कायदा मागे घेण्याची हिंमत आहे का कुणाची ? इंडिया आघाडी एक वर्ष एक पीएम असे पाच वर्षात पाच पंतप्रधान करतील, अशा परिस्थितीत हा देश कधी सहन करणार नाही, असा इशारा देत मोदी यांनी इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदावरूनही भाष्य केले.

महायुतीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित महाविजय संकल्पसभेत पंतप्रधान बोलत होते. कोल्हापूरला महाराष्ट्रातील फुटबॉल हब मानले जाते. फुटबॉल हा खेळ तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. महायुती आणि इंडिया आघाडीमधील हा सामना 2-0 असा जिंकणार असून इंडिया आघाडीने दोन सेल्फ गोल केल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, तिसऱ्या टप्प्यातील जबाबदारी कोल्हापूरकरांवर असून असा गोल करा की येणारे चार राउंडमध्ये इंडिया आघाडी चितपट होईल. त्यांनी सांगितले की, ‘सरकार बनावो आणि नोट कमाओ’ हा काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा अजेंडा आहे. भाजप तरुणांना अधिक संधी देणार आहे. बिना व्याज 20 लाख कर्ज दिले जाणार आहे. महिलांची सुरक्षा ही मोदींची गॅरेटी आहे. तीन कोटी महिलांना लखपती महिला बनवण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. माझे एक काम करा, भेटेल त्याला सांगा मोदींना मताच्या रूपाने आशीर्वाद द्यायला असेही मोदी म्हणाले. तुमचा आशीर्वाद हीच माझी प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्नाटक आणि तामिळनाडू वेगळा देश करण्याची भाषा करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत हे सहन होईल का? त्यांना उत्तर दिले पाहिजे. 500 वर्षांचे स्वप्न राम मंदिराच्या निमित्ताने पूर्ण झालं असून जे रामाचे निमंत्रण स्वीकारत नाही त्यांचे काय होणार? ज्यांनी सनातन धर्म डेंग्यू मलेरिया आहे, असे म्हटले त्यांना महाराष्ट्रात आणून सत्कार केला, यावरून बाळासाहेब ठाकरे यांची काय अवस्था झाली असेल हे लक्षात येत असल्याचे म्हणाले. नकली शिवसेना औरंगजेबाला मानणारी झाली असल्याचेही ते म्हणाले. कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं असून त्यामुळे ओबीसींवर अन्याय झाल्याचे मोदी म्हणाले. हाच फॉर्म्युला त्यांना देशभर वापरायचा असून धर्माच्या नावाखाली तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हणाले.

मान गादीला, मत मोदींना : फडणवीस

कोल्हापूरची लढाई संजय मंडलिक विरुध्द शाहू महाराज आणि धैर्यशील माने विरुध्द महाविकास आघाडी अशी नाही तर नरेंद्र मोदी विरुध्द राहुल गांधी अशीच होत आहे. त्यामुळे, मान देऊया गादीला मत देऊया नरेंद्र मोदींना हे कोल्हापूरकरांनी ठरवलं आहे. कोल्हापूरचा हुंकार दिल्लीत पोहचवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.