जळगाव जिल्ह्यात भाजप गड कायम राखणार..?

0

लोकशाही संपादकीय लेख 

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीत १३ मे रोजी जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा २०२४ साठी दोन्ही मतदार संघात दोन टक्क्यांनी मतदान वाढले आहे. म्हणजे जळगावसाठी २०१९ ला ५६ % तर रावेरसाठी ६१ % इतके मतदान झाले होते. यंदा जळगाव ५८ % तर रावेरला ६३ % इतके मतदान झाले आहे. ‘वाढीव मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार?’ हे पाहणे उत्सुकतेचे राहील. पारंपरिक विचार केला तर वाढीव मतदान झाले, तर त्याचा फायदा सत्ताधारी पक्षाला होतो. परंतु यंदाची परिस्थिती वेगळी होती. म्हणून वाढीव मतदानाचा फायदा विरोधकांना म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक, पत्रकार, टीव्ही चॅनलतर्फे वर्तविण्यात येत आहे. तसेच २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपने पर्यायाने ‘मोदी सरकारने’ जी आश्वासने दिली होती, ती पाळली नसल्याने गेल्या दहा वर्षाच्या मोदी सरकार विषयी मोठ्या प्रमाणात आरोप असल्याने जनता नाराज असल्याचे चित्र निवडणूक प्रचारादरम्यान दिसून आल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. जीवनावश्यक वस्तूंनी महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगार तरुणांचा प्रश्न, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, अल्पसंख्यांकांना वाटणारी असुरक्षितता, हे प्रश्न या निवडणुकीत ऐरणीवरचे मुद्दे ठरले. त्यातच जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील निवडणुक स्थानिक मुद्द्यांवरच गाजली.

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार उमेश पाटलांचे तिकीट कापल्यामुळे त्यांनी भाजपला रामराम ठोकून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात केलेला प्रवेश आणि भाजपचेच नेते असलेले करण पवार यांना ऐनवेळी शिवसेनेची देण्यात आलेली उमेदवारी त्यामुळे भाजपला सोपी असलेली ही निवडणूक चुरशीची बनली. महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे उमेदवार करण पवार यांचा केलेला एक दिलाने प्रचार सुद्धा भाजपसाठी डोकेदुखी ठरली. जळगाव आणि रावेर मध्ये उमेदवारी अर्ज भरताना महायुती आणि महाविकास आघाडीतर्फे तोडीस तोड झालेली शक्ती प्रदर्शने तसेच प्रचार सांगतेच्या दिवशी जळगाव व शहरातून तसेच इतर ठिकाणाहून निघालेल्या प्रचार रॅली पाहिल्या तर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात ‘काटे की टक्कर’ असल्याचे चित्र स्पष्ट दिसून आले.

रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपतर्फे रक्षा खडसेंना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली. तथापि भाजपातील एका गटाची नाराजी दूर करण्यात श्रेष्ठींना यश आले. दोन्ही मतदारसंघात भाजपचे संघटन मजबूत असल्यामुळे फायदा असल्याचा फायदा भाजपच्या उमेदवारांना मिळणार आहे. रावेरमध्ये राष्ट्रवादीचे श्रीराम पाटील हे नवखे उमेदवार असल्याने ही निवडणूक रक्षा खडसेंसाठी एकतर्फी होईल असे वाटले होते, परंतु श्रीराम पाटलांसाठी शरद पवारांच्या झालेल्या सभेमुळे वातावरण बदलले. तसेच स्थानिक प्रश्न प्रचारात उचलल्याने मतदारांची सहानुभूती मिळविण्यात त्यांना यश आले. म्हणून निवडणुकीत चुरस निर्माण झाली. मराठा अल्पसंख्यांक दलित मतदारांना खेचण्यात श्रीराम पाटील यांना यश आले असे म्हणतात. आता चार जूनच्या निकालावरच काय ते स्पष्ट होईल. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट होती, तशी मोदींची लाट मात्र यंदाच्या निवडणुकीत दिसली नाही. त्यामुळे भाजपच्या उमेदवारासाठी ही निवडणूक तशी सोपी नव्हती. दोन्ही मतदार संघात भाजपचे नेटवर्क उत्तम असल्याने त्याचा फायदा भाजपच्या स्मिता वाघ आणि रक्षा खडसे यांना होणार आहेत. तथापि मागील २०१९ प्रमाणे मताधिक्य त्यांना मिळणे शक्य नाही. त्यांचे मताधिक्य घटेल असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. तसेच महायुती अथवा महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार निवडून येईल त्यांचे मताधिक्य हे लाखाच्या आतलेच असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.