खडके बालगृहातील नराधमाचे आणखी कारनामे उघड;चार पीडित मुली आल्या समोर

0

जळगाव / एरंडोल : – एरंडोल तालुक्यातील खडके येथील वस्तीगृहातील आणखी उघड झाली आहे. आणखी चौघा मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील एका मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून नराधम गणेश पंडित याच्यासह संस्थाध्यक्ष, शिक्षक यांच्यासह नराधमाचा गुन्हा लपवून ठेवणाऱ्या बालकल्याण समितीच्या अध्यक्षासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एरंडोल तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीने गुरुवारी ३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी फिर्याद दाखल केली आहे. ती एरंडोल येथील खडके वस्तीगृहात इयत्ता चौथीत असताना प्रवेशित झाली होती. त्याच्यानंतर २०१८ सालापासून ५ वर्षात नराधम गणेश शिवाजी पंडित याने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले. तिने इतर मुलींशी चर्चा केली असता त्यांच्यासोबत देखील असा प्रकार घडल्याचे तिला लक्षात आले. त्यामुळे तिने हा प्रकार संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर यशवंत पाटील आणि शिक्षक प्रताप पाटील यांना सांगितला. मात्र हा प्रकार कोणाला सांगू नका म्हणून त्यांनी पीडित मुलींना दम दिला.

त्यानंतर खडके वस्तीगृहामध्ये भेटीसाठी जळगावची बालकल्याण समिती आली होती. त्यावेळेला समितीच्या अध्यक्षा देवयानी मनोज गोविंदवार (वय ४१, रा.रायसोनी नगर, जळगाव), सदस्या विद्या रवींद्र बोरनारे (वय ५१,रा. भगवान नगर, जळगाव) व दुसरे सदस्य संदीप निंबाजी पाटील (वय ४१ रा. मोहन नगर, जळगाव) यांना पीडित मुलींनी गणेश पंडित यांनी केलेले कृष्णकृत्य सांगितले. त्यांनी हे सर्व लिखित द्या म्हणून सांगितले.

त्यानुसार एका कागदावर सहा मुलींनी त्यांच्यासोबत घडलेल्या वाईट प्रसंगांबाबत लिहिले. तो कागद संदीप निंबाजी पाटील यांच्याकडे दिला. त्यानंतर फिर्यादी पीडित मुलीचे ऍडमिशन जळगावच्या वसतिगृहात झाले. मात्र बालकल्याण समितीकडे तक्रार देऊन देखील नराधम गणेश पंडित याच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. बालकल्याण समितीने देखील प्रकरण माहित असून दडपून ठेवले.यामुळे आता गुरुवारी 3 ऑगस्ट रोजी नराधम गणेश पंडित, संस्थाध्यक्ष प्रभाकर पाटील, शिक्षक प्रताप पाटील यांच्यासह बालकल्याण समितीचे अध्यक्ष देवयानी गोविंदवार, विद्या बोरणारे, संदीप पाटील अशा सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामुळे एकच खळबळ उडाली असून पीडितांची संख्या आता १२ झाली आहे. यापूर्वी ५ मुली, ३ मुले यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल झाले होते. आता आणखी चार मुली पुढे आले आहेत. त्यामुळे नराधम गणेश पंडित याचे काळे कारनामे उघड झाले आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.