श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

अभंग -16

दास विठ्ठलाचे व्हावे

तरि च जन्मा यावें I
दास विठ्ठलाचें व्हावें II1II
नाहीं तरि काय थोडीं I
श्वानशकरें बापुडीं II ध्रु II
ज्याल्याचें तें फळ I
अंगी लागों नेदी मळ II2II
तुका म्हणे भले I
ज्याच्या नावें मानवलें II3II

अभंग क्रमांक २४८८

आद्य शंकराचार्य म्हणतात, “पुनरपि जननं पुनरपि मरणं” असे संसारचक्र चालूच राहते. पण आपणासारख्या सर्वसामान्य माणसांना हे जन्ममरणाचे चक्र उमगत नाही. त्याची तीव्रता जाणवत नाही. त्यातून कसे सुटायचे याची नेमकी खूणगाठ ठाऊक नसते. अमुक अमुक गोष्टी करणे म्हणजे पुण्य व अमुक अमुक गोष्टी करणे म्हणजे पाप अशी ढोबळ धारणा असते. पाप केले तर नरकात जाणार व पुण्य केले तर स्वर्गात व्यक्ती जाते अशा दृढ कल्पना असतात. इतपतच सर्वसामान्य माणसाची बुद्धी काम करते व तितकेच त्याची झेप असते काही बुद्धीवादी मंडळी पाप-पुण्याचा नादी न लागता माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे या न्यायाने राहतात ते योग्यही असते. काही माणसात देव पाहतात. समाजसेवा करतात. देव नाही देव्हाऱ्यात हे त्यांचे तत्वज्ञान असते. मोक्ष वगैरे आपल्याला काही झेपणार नाही त्यामुळे केवळ काही संसार नीट करूया या ध्येयाने काही प्रेरित असतात एकूणच शुद्ध अद्वैत ग्रंथाचे वाचन नसते श्रवण नसते दासबोध ज्ञानेश्वरी या ग्रंथांची ओळख असते पण त्यातील मार्गदर्शन आचरणासाठी आहे याबाबत निश्चय नसतो या साऱ्या गोष्टीचा परिणाम म्हणजे भक्तीच्या या अथांग प्रांगणात आपली वानवाच असते

कित्येक योनी फिरून झाल्यावर मोठ्या भाग्याने आपल्याला नरदेह लाभलेला असतो. आयुष्य हीच ‘रत्नपेटी’, ‘रत्नाची खाण’ इतके त्याला महत्त्व असते. हा नरदेह लाभलेले घबाड असते. पण त्याचे गंभीर्य आपल्याला फारसे नसते. आपण आपल्यापेक्षा मोठे (वयाने) मंडळी जसे आचरण करतात त्या पावलावर पाऊल टाकून चालत राहतो.

संतश्रेष्ठ तुकोबाराय आपल्याला जागे करतात,सावध करतात, आपल्याला उपदेश करतात व म्हणतात तुम्ही विठ्ठलाचे दास व्हा, संसार करा, शिक्षण करा, नोकरी धंदा उत्तम करा. आई-वडिलांचे, समाजाचे ऋण फेडा. संसारचक्र चालण्यासाठी हे सर्व करायलाच हवे फक्त एवढेच करून थांबू नका तर ‘स्वहित’ साधा ‘आत्महित’ साधा. ते प्राप्त करण्याचा प्रयत्न अवश्य करा. यासाठी रामदासस्वामी एक चपखल दाखला देतात. अरे नोकरीच्या ठिकाणी तुम्ही साहेबाचे दासच असता ना.
” मग साहेबासी लोटांगणी जावे I नीचा सारखे व्हावे I पण देवासी न भजावे I ”
हा कुठला न्याय आपल्याला भगवंताने बुद्धी- शक्ती – युक्ती सारकाही दिले आहे. मग विचारही आपण केला पाहिजे.
नाहीतर सृष्टीत किती प्राणी आपण पाहतो,अनुभवतो. किडा आहे,कीटक आहे ,माशी आहे, सरपटणारे प्राणी आहेत,जंगली प्राणी आहेत.काही अगदी जीवजंतू सारखे प्राणी ते हत्ती, वाघ, सिंह असे वनचर आहेत पण त्यांच्यापाशी फक्त आहार ,भय,निद्रा याच गोष्टी आहेत.

चौर्याऐंशी लक्ष योनी फिरून झाल्यावर हा सुंदर देह, सुंदर मुखकमल, भगवंताने आपल्याला दिले.मग त्या मुखाने राम नाम नको का घ्यायला? असे संत तुलसीदास विचारतात. जन्माला आल्यावर आयुष्यभर काय करायचे हे ठरवायचे आहे. शक्यतो बरीच मंडळी हे भजनशील असतात. तसे संस्कार हे लहानपणापासून होतात. पाटीवर गिरवताना मुलाला प्रथम “श्री गणेशा” म्हणूनच शिकवतात. सायंकाळी रामरक्षा, शुभंकरोती, परवचा म्हणून घेतात. बरीच मंडळी उपवास करतात, व्रतवैकल्य करतात, तीर्थयात्राही करतात. पण हा समज चुकीचा आहे की गंगेत जाऊन स्नान केले की आपली सर्व पाप धुवून गेली. पण इतके हे सोपे नाही तुकाराम महाराजांना अभिप्रेत आहे,”जन्मा आल्याचे फळ Iअंगा लागो नेदी मळ II” देह संबंधित बाह्यांगावर जो मळ असतो तो दूध, हळद ,उटणे, उत्तम प्रतीचा साबण याने तो निघून जातो. पण जेव्हा अंतरंगाचा विचार केला जातो तेव्हा,”नाही निर्मळ मन I काय करेल साबण II ” हेच वचन खरे असते.कारण काम, क्रोध, मोह मद ,मस्त ,अहंकार हे षड्रिपू नकळत आपल्यावर कुरघोडी करतात व वारंवार आपण मलिन होतो म्हणून साधना करून हे सार हद्दपार नाही करू शकत पण या गोष्टी आपण ताब्यात आणू शकतो.

“संयमी जीवान बाणता सहज I स्वामी म्हणे तुझं योग सिद्धी I ” पावसचे स्वामी स्वरूपानंद यासाठी संयमी जीवन ग्राह्य मानतात. त्याने सहज योग व भक्तीच्या प्रांतात आपण प्रवेश करू शकतो व पुढे जाऊन “झडझडोनी वहिला रिघा I इया भक्तीच्या वाटा लाग II ” असे माऊली प्रतिपादन करते. म्हणजेच विठ्ठलाचे आपण अनन्यभावे दास झालो तरच अव्यंग असे निजधाम आपण प्राप्त करू शकतो. नाहीतर “मृत्यू न म्हणे यशवंत I मृत्यू न म्हणे भाग्यवंत I” हे एक विदारक सत्य आहे. जगद्जेता सिकंदर ही म्हणतो,आता माझे दोन्ही हात रिकामे आहेत व मी हे जग सोडून चाललो आहे.

येथे एकच तरुन जातात जे भक्ती भावाने मला भजतात. या मायाजालातून त्यांची सुटका होते. ऐहिक उत्तम संपादन करूनही प्रयत्नपूर्वक परमार्थ केला,भक्ति साधली तर ” नर करणी करे तो नरका नारायण बन जाए” आणि यातच खरा पुरुषार्थ आहे. उपासनेला दृढ चालवावे, नित्य उपासना निरंतर चालवावी. हळूहळू आपण दास या पदवीला प्राप्त होऊ शकतो. ” बनत बनत बन जाए” अशी ही प्रक्रिया राहते. तेव्हाच ‘भला रे भला नर’ असे कौतुकास्पद स्तुतीला आपण प्राप्त होऊ.

श्रीकृष्ण शरणं मम् …..

लेखिका -भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.