मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. मात्र दोन्ही गटांनी एकमेकांना आव्हान दिल्यानंतर आता दोन्ही गटांचं मनोमिलन होण्याची शक्यता मात्र धूसर आहे. माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांवर थेट खळबळजनक वक्तव्य करत पुढील ३ महिन्यात अजित पवार तुरुंगात दिसतील, असे भाकीतच त्यांनी केलं आहे.
पवारांचे बंड स्वार्थासाठी
शालनीताई पाटील म्हणाल्या की, शरद पवार आणि अजित पवार यांच्या बंडामध्ये जमीन आस्मानाचं अंतर आहे. शरद पवारांचे बंड पक्षातील आमदार दुसरीकडे जाऊ नयेत यासाठी होते. तर अजित पवारांचे बंड स्वार्थासाठी होते. उपमुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी होते. पुढील तीन महिन्यात अजित पवार तुरुंगात दिसतील, त्यामुळे त्यांना कुठल्याही निवडणुका लढवता येणार नाहीत. कारण, २०२४ मध्ये लोकसभा, विधानसभा या सर्व निवडणुका होत आहेत.
मोदींवर माझा विश्वास..
तसेच मी त्यांच्याविरुद्ध आता तीन अर्ज उच्च न्यायालयात दाखल करणार आहे. पुढील १० दिवसांत हे अर्ज दाखल होतील. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अजित पवार हे शिखर बँकेच्या २५ हजार कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार आहेत. म्हणून महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांवर पहिला अर्ज असणार की, याप्रकरणी ताबडतोब दोषारोपपत्र ठेवा. आम्ही एफआयआर दाखल केलं आहे, त्यांच्यावर चार्जशीट ठेवा आणि अजित पवारांना न्यायालयात उभं करा. ५ वर्षे फुकट गेल्यामुळे हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात घेण्याची विनंती आम्ही न्यायालयात करणार आहोत. माझी प्रॉपर्टी ईडीच्या ताब्यात आहे, ती प्रॉपर्टी आमच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी आम्ही दुसऱ्या अर्जातून करणार आहोत. मोदींवर माझा विश्वास राहिला नाही, शिंदे-फडणवीस सरकार व्यवस्थित चाललं असताना तुम्हा अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं हे योग्य नाही, असेही शालिनीताई पाटील यांनी म्हटलं.