ॲड. रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादीमध्ये खरी कसोटी..!

0

लोकशाही संपादकीय लेख 

अडीच पावणे तीन वर्षांपूर्वी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या समवेत जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे खेवलकर यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर शरद पवार काँग्रेसतर्फे रोहिणीला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. त्याआधी एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीतर्फे विधान परिषदेचे आमदार करण्यात आले. आता अलीकडे एकनाथ खडसे हे भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याचे स्वतः खडसेंनी जाहीर केले आहे. वडील जरी भाजपामध्ये घर वापसी करीत असले तरी आपण मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे रोहिणींनी जाहीर केले आहे.

एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस वाढविण्यात त्यांनी मदत करावी, ही अपेक्षा चुकीची ठरली. उलट राष्ट्रवादी काँग्रेसचे फार मोठे नुकसान झाले, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)च्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. विशेषतः ‘जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नुकसान झाले’, असा आरोप माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी करून शरद पवारांकडे आपली व्यथा मांडली. तेव्हा शरद पवारांनी सुद्धा ‘खडसेंना पक्षात घेऊन चुकत झाली’, अशी खंत व्यक्त केली आहे. एकनाथ खडसे रावेर लोकसभेची निवडणूक लढविणार, असे पक्षातर्फे जाहीर केले होते. तथापि प्रकृतीचे कारण देऊन त्यांनी शेवटी निवडणूक लढविण्यास नकार दिला. त्यानंतर रोहिणी खडसे यांनी रावेरची लोकसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरला. तथापि “माझी विधानसभेची तयारी आहे. लोकसभेची नाही..” म्हणून रोहिणी यांनी रावेरची निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शविली. त्यानंतर वडील एकनाथ खडसेंच्या घरवापसीचे प्रकरण समोर आले, तेव्हा रावेर लोकसभेच्या उमेदवारीचा तीढा सोडवण्यासाठी अखेर उद्योगपती श्रीराम पाटील यांना भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन उमेदवारी दिली गेली. आता ही लढत खासदार रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील अशी किमान काट्याची लढत होऊ शकते, असे बोलले जात आहे.

तथापि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्षा म्हणून रावेर लोकसभेच्या निवडणुकीत रोहिणी खडसे यांचा सहभाग कसा असेल, याकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्ष असताना रावेर लोकसभेची ऑफर रोहिणीने नाकारायला नको होते. कारण बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार या राजकारणात सक्रिय सहभागी नसताना विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचे विरोधात निवडणूक लढविणार आहेत. बारामतीत नणंद भावजय सामना रंगतोय. निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. रोहिणी खडसे यांना तर राजकारणाचा मोठा अनुभव आहे. पाच वर्ष जिल्हा बँकेच्या त्या अध्यक्षा होत्या. २०१९ मध्ये मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून रोहिणी खडसेंनी निवडणूक लढवली आहे. अवघ्या हजार बाराशे मतांनी त्या पराभूत झाल्या होत्या. म्हणून रावेर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात रोहिणी उतरल्या असत्या तर ननंद भावजय असा सामना रंगला असता. महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीने वेधून घेतले असते.

आता रावेर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अधिकृत उमेदवार जाहीर झाला. उमेदवार राष्ट्रवादीचा असला तरी महाविकास आघाडीचा पाठिंबा त्याला राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा राहणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांविरोधात एकनाथ खडसेंकडून प्रचार केला जाईल. स्वतः रोहिणी खडसेंनी या निवडणूक प्रचारात हिरीरीने पुढाकार घेऊन जास्तीत जास्त मतदान राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराला मिळविणे आवश्यक आहे. त्यात त्यांचा सहभाग कसा राहील यावर आगामी काळात ॲड. रोहिणी खडसे यांचे भवितव्य अवलंबून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी तसे सूचक वक्तव्य केले आहे. “जर रोहिणी खडसेंकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान मिळवून देण्यासाठी चांगले प्रयत्न असले, तरच त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षातर्फे उमेदवारी दिली जाईल, अन्यथा नाही..” सतीश पाटलांचे हे वक्तव्य अत्यंत सुचक आणि रोहिणी खडसेंसाठी कसोटीचे मानावे लागेल. त्यामुळे जरी रोहिणी खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य असला तरी त्यांची मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कसोटी लागणार आहे. कारण आतापर्यंत वडील एकनाथ खडसे यांच्या छत्रछायेखाली तसेच मार्गदर्शनाखाली त्यांनी काम केले आहे. आता वडील एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्या राजकीय वाटा वेगळ्या आहेत. एकनाथ खडसे यापुढे भाजपसाठी कार्य करतील तर रोहिणीला राष्ट्रवादी काँग्रेसचे विशेषता राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला संघटन स्वतंत्रपणे करावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर रोहिणीच्या कार्याची पक्षात दखल घेतली जाईल.. पाहूया ‘घोडा मैदान जवळच आहे’…!

Leave A Reply

Your email address will not be published.