जळगावात ठाकरे गटाला भगदाड !

0

पदाधिकाऱ्यांसह चारशे कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश : शरद पवार गटातील कार्यकर्त्यांचाही समावेश
जळगाव ;- लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना ठाकरे गटाला मात्र धक्क्यांवर धक्के सहन करावे लागत आहेत. शिवसेनेत फूट पडल्यापासून कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे वाढता ओघ अजूनही सुरुच आहे. त्यामुळे ठाकरे गटाला लागलेली गळती काही थांबायचे नाव घेत नाही. त्यातच आता ठाकरे गटाला जळगावातही मोठे भगदाड पडले आहे. जळगावमधील पदाधिकाऱ्यांसह चारशे कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत रविवारी रात्री हा पक्षप्रवेश पार पडला.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर व चोपडा परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील तसेच शरद पवार गटातील जवळपास चारशे कार्यकर्त्यांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रात्री उशिरा शिवसेनेत प्रवेश केला. बुलढाणा येथील बुलढाणा रेसिडेन्सी क्लब येथे हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील, बुलढण्याचे खासदार प्रतापराव जाधव व आमदार चिमणराव पाटील उपस्थित होते. हे सर्व कार्यकर्ते जवळपास 60 ते 70 वाहनांतून बुलढाण्यात पोहोचले होते.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : शिंदे
पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही निवडणुकीत गुंतलो असलो तरी मी दररोज सकाळी माहिती घेतो. त्याप्रमाणे मी मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतो. त्यांना सूचना देतो की, तात्काळ पंचनामे करा हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जागरूक आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना नुकसान भरपाई मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.