घराणेशाही : बुडाखालचा अंधार !

0

मन की बात (दीपक कुलकर्णी)

घराणेशाही…. घराणेशाही….घराणेशाही हे शब्द तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात हमखास ऐकण्यास मिळतील. काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करतांना हे शब्द भाजप नेत्यांच्या तोंडपाठ झालेले आहे. गेली सत्तर वर्षे देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसने घराणेशाहीचा पुरस्कार केल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे असले तरी भारतीय जनता पक्षामध्येही घराणेशाही आहेच ! फक्त भाजपमधील ती घराणेशाही जनतेसमोर उघड करण्यात काँग्रेसला यश आलेले नाही ऐवढेच! लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारी घेण्यासाठी घराणेशाहीचा विचार झालेला दिसतो. राज्यात घराणेशाहीमधील तब्बल वीस उमेदवार रिंगणात उतरले आहे, धक्कादायक म्हणजे त्यात भाजपचा पहिला क्रमांक लागतो. भाजपमध्येही काँग्रेसच्या संस्कृतीचे या निमित्ताने दर्शन झाले आहे.

निवडणुका आल्या की घराणेशाहीचा विषय सातत्याने पुढे येत असतो. घराणेशाहीच्या राजकारणावर टीकास्त्र सोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सर्वाधिक सात उमेदवारांचा लोकसभा निवडणुकीत समावेश आहे. महाराष्ट्रात घराणेशाहीचे प्रतिनिधित्व करणारे वीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याकडे मात्र कुणाचेही लक्ष केंद्रीत होत नाही. सारेच पक्ष घराणेशाहाचा पुरस्कार करीत आहेत, हे वारंवार घडणाऱ्या घटनांवरुन सिद्ध झालेले असतांनाही एकमेकांवर घराणेशाहीचा आरोप करण्यात कसली धन्यता मानतात हे कुणास ठाऊक ! घराणेशाहीचे प्रतिनिधित्व करणारे भाजपचे सात, दोन्ही शिवसेनेचे प्रत्येकी तीन, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन, वंचित बहुजन आघाडीकडून स्वत: प्रकाश आंबेडकर असे वीस उमेदवार घराणेशाहीचा झेंडा मिरवित आहेत.

घराणेशाहीमधील या वीस पैकी महायुतीकडून तब्बल तेरा आणि महाविकास आघाडीकडून सहा उमेदवार दिले गेले असतांनाही हे पक्ष घराणेशाहीवर कुठल्या तोंडाने बोलतान हे कळतच नाही. ‘स्वत:चे ठेवावे झाकून अन्‌ दुसऱ्याचे पहावे वाकून’ असाच हा प्रकार आहे. सजग मतदारराजा जेव्हा कुठल्या नेत्याच्या सभेला गेला आणि तेथे त्या नेत्याने घराणेशाहीचा मुद्दा हाती घेतला तर तडक आपण आपले ‘घर’ गाठावे. तेव्हांच यांना यांची जागा कळणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीतील प्रतिनिधी लोकसभेच्या रिंगणात आहेत. बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या कन्या, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी, माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे अमोल कीर्तीकर हे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांचे पुत्र, उत्तर मुंबईतील भाजपचे पीयूष गोयल हे माजी केंद्रीय मंत्री वेदप्रकाश गोयल आणि माजी आमदार चंद्रकांता गोयल यांचे पुत्र, माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे संभाव्य उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील हे सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे नातू आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे, रावेरमधील भाजपच्या रक्षा खडसे या माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा, कल्याणमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र, दिंडोरीमधील भाजपच्या डॉ.भारती पवार या माजी मंत्री ए.टी.पवार यांच्या स्नुषा, सोलपूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या, बीडमधील भाजपच्या पंकजा मुंडे या माजी उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या तर विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांच्या भगिनी, उस्मानाबादमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या अर्चना पाटील या भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी, माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या स्नुषा, हातकणंगले महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचे आजोबा बाळासाहेब माने व त्यांच्या मातोश्री निवेदिता माने याही खासदार होत्या, याच मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांचे वडील बाबासाहेब पाटील-सरुडकर हे शाहूवाडीचे आमदार होते.

कोल्हापूर महायुतीतील उमेदवार संजय मंडलिक हे माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र, ईशान्य मुंबईतील शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे संजय दिना पाटील यांचे वडील दिना बामा पाटील हे मुंबई काँग्रेसचे नेते होते. नंदुरबारमधील भाजपच्या डॉ.हीना गावित या विद्यमान मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या. तर येथील काँग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी हे माजी मंत्री के. सी. पाडवी यांचे पुत्र आहेत. अहमदनगरमध्ये भाजपचे सुजय विखे पाटील यांचे आजोबा बाळासाहेब विखे-पाटील केंद्रात मंत्री होते, वडील राधाकृष्ण विखे-पाटील हे सध्या राज्य मंत्रिमंडळात आहेत. अकोल्यातील भाजपचे अनुप धोत्रे यांचे वडील संजय धोत्रे हे विद्यमान खासदार असून चार वेळेस ते निवडून गेले आहेत, तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. या नावावरुन घराणेशाही काय असते हे तुमच्या लक्षात आले असेलच! मग नेते मतदारांच्या डोळ्यात धुळफेक करुन घराणेशाहीचा मुद्दा का म्हणून रेटत असतात. देशात, राज्यात, जिल्ह्यात अन्‌ मतदारसंघात बहुतांश प्रश्न ‘आ’ वासून असतांनाही त्यावर ही नेते मंडळी का बोलत नाही? प्रत्येकाच्या बुडाखाली अंधार असल्याने ते मतदारांच्या डोळ्यात धुळफेक करत असतात हे मात्र पक्क!

Leave A Reply

Your email address will not be published.