ठेका रद्द करण्यासाठी आयुक्तांची चालढकल !
कंपनीने घेतला काढता पाय : रुग्णवाहिका चालकांचा प्रश्न अधांतरी
जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
जिल्हा सामान्य रुग्णालयातील 102 रुग्णवाहिका ठेकेदार असलेल्या मुंबई येथील राजछाया इनोवेटीव्ह सर्व्हिस कंपनीचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे असतांना देखील ते चालढकल करीत असल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे कंपनीने जिल्ह्यातून आपला गाशा गुंडाळण्याची तयारी दर्शविली असली तरी अधिकारी मात्र ठोस भूमिका घेत नसल्याने रुग्णवाहिका चालकांचा प्रश्न अधांतरीच आहे.
गेल्या चार महिन्यांपासून संबंधित ठेकेदार हा रुग्णवाहिका चालकांचे मानधन देत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असतांना देखील कंपनीवर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. सहसंचालक डॉ. विजय बाविस्कर व डॉ. उमेश शिरोडकर यांनी कंपनीचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविला असतांनाही त्यावर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. गेल्या महिन्याभरापासून चालकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करुनही ठोस कारवाई करण्यात येत नसल्याने कुठे तरी पाणी मुरत असल्याची चर्चा आहे.
आयुक्तांची भूमिका संशयास्पद
संबंधीत कंपनीचा ठेका रद्द करावा असा प्रस्ताव सहसंचालकांनी आयुक्तांकडे पाठविला असतांनाही त्यावर अद्यापही कारवाई झाली नसल्याने यात आयुक्तांची भूमिका संशयास्पद वाटत आहे. चालकांना न्याय देण्यासाठी आयुक्तांनी कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी होत आहे.