आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांची १७ सप्टेंबरला क्षमता चाचणी परीक्षा

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांनाही परीक्षा द्यावी लागणार आहे. इयत्ता १ ली ते १२ वीच्या शिक्षकांची १७ सप्टेंबर रोजी क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे. चोपडा येथील महात्मा गांधी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय या केंद्रावर जिल्ह्यातील ६८१ शिक्षक क्षमता चाचणी देणार आहेत. अशी माहिती यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी दिली आहे.

आदिवासी विकास विभागामार्फत चालवण्यात येत असलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असतात. शिक्षकांचे विषयज्ञान वृध्दींगत व्हावे, त्यांना स्व:अध्ययनाची आवड निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वातावरणात स्वतःची गुणवत्ता सिध्द करण्याची संधी मिळावी, ह्या उद्देशाने क्षमता चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे. क्षमता चाचणी एससीईआरटी/एनसीईआरटी (SCERT / NCERT) च्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. क्षमता चाचणी करिता कला व विज्ञान शाखेचे तीन गट करण्यात आले आहेत. पहिला गट इयत्ता १ ली ते ७ वी, दुसरा गट – ८ वी ते १० वी, तिसरा गट – इयत्ता ११ वी व १२ वी असे आहेत. क्षमता चाचणी १०० गुणांची असणार असून त्यामध्ये एकूण ५० बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. त्यापैकी ७० टक्के प्रश्न हे विषयावर आधारित असतील व ३० टक्के प्रश्न हे सामान्य ज्ञान, मानसिक क्षमता व चालू घडामोडी यावर आधारित असतील.

यावल प्रकल्प कार्यालयातर्गंत येणाऱ्या १७ शासकीय व ३२ अनुदानित आश्रमशाळा मध्ये कार्यरत ६८१ शिक्षक क्षमता चाचणी परिक्षेसाठी बसणार आहेत. क्षमता चाचणी परिक्षेत उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या शिक्षकांना गौरविण्यात येणार आहे. त्यांच्या कार्यपद्धतीचा इतर शिक्षकांसाठी अवलंब करण्यात येणार आहे,  शिक्षकांना अद्ययावत विषय ज्ञानाबाबत प्रशिक्षणाची आवश्यकता आहे किंवा कसे हे या माध्यमातून ठरवण्यात येणार आहे. यावल प्रकल्पातील सर्व शिक्षकांनी कोणतीही भीती न बाळगता क्षमता चाचणी परीक्षा मोठ्या संख्येने द्यावी. असे आवाहन श्री पवार यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.