‘ए.टीं’ना उमेदवारी द्याना… अनेकांची ‘ना…ना’!

0

मन की बात (दीपक कुलकर्णी)

 

अठराव्या लोकसभेचा बिगुल वाजला अन्‌ अनेकांना खासदार होण्याचे स्वप्न पडू लागले. प्रत्येक पक्षात आयाराम-गयाराम यांची संख्या लक्षणियरित्या वाढली अन्‌ पक्ष श्रेष्ठींसमोर मोठा पेच निर्माण झाला. जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टीने उमेदवारांची घोषणा करीत विरोधकांची ‘हवा’ काढण्याचे काम केले असले तरी भाजपत आता स्वपक्षीयच उमेदवारी कापण्यासाठी हाती करवत घेवून बसले आहेत. सुरुवातीला रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न झाल्याने भाजपमधील दुफळी उफाळून आली. मंत्री गिरीश महाजन यांनी तेथील नाराजीनाट्यावर पडदा टाकण्याचे काम केले असले तरी त्यात किती यश येणार हे निकालावरुन स्पष्ट होणारच आहे.

भाजपला अडचणीत आणण्यासाठी व आपला उल्लू साध्य करण्यासाठी काही भाजपमधील कार्यकर्ते चांगलेच सक्रिय झालेले आहेत. आतापर्यंत शांत असलेला जळगाव लोकसभा मतदारसंघातही उमेदवारीवरुन देखील वादाला सुरुवात झालेली आहे. विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपला रामराम करीत उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंध बांधल्याने जळगाव मतदारसंघात जोरदार हालचाली सुरु झाल्यात. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उन्मेष पाटील यांच्या सांगण्यावरुन करण पवार यांना उमेदवारी दिली असतांना लागलीच पारोळा निवासी माजी खासदार ए.टी. पाटील हे सक्रिय झाले. कुणाला तरी हाताशी धरुन त्यांनीही उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा केली आणि त्वरेने मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आणि  या भेटीला राजकीय रंग येवू देखील लागला.

ए.टी. पाटील हे भाजपचे खासदार राहून चुकलेले आहेत. पक्षाचे ध्येय-धोरण त्यांना चांगले ज्ञात असतांनाही त्यांनी उमेदवार जाहीर झाल्यानंतर अशी अपेक्षा व्यक्त करणे उचित होत नाही. तरीही नानांचा हा प्रयत्न म्हणजे अशांती निर्माण करणारा आहे. रावेर व जळगावात जे काही वादळ निर्माण होत आहे त्याला पक्षातूनच खतपाणी दिले जात आहे. आजपर्यंतच्या इतिहासात भाजपमध्ये अशा प्रकारे जाहीर उमेदवारीची मागणी कधीही झालेली नाही. परिवाराच्या संस्कारातून तयार झालेले कार्यकर्ते अशी मागणी कधीही करणार नाही वा नाराजी देखील व्यकत करणार नाही. त्याचे उदाहरण म्हणजे स्मिता वाघ होय ! गत निवडणुकीत स्मिता वाघ यांची उमेदवारी कापली गेली असतांनाही त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली नाही. सध्याच्या राजकारणातील आयाराम-गयाराम संस्कृतीमुळे असे प्रकार वरच्यावर मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. भाजपने अशा आयाराम-गयारामांसाठी एकदा म्हाळगी प्रबोधनीचा अभ्यास वर्ग ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण भाजपमध्ये अन्य पक्षाची संस्कृती जर उदयाला आली तर ती धोक्याची घंटा ठरणार आहे. मुळात ए.टी. पाटील, उन्मेष पाटील हेही दुसऱ्या पक्षातूनच भाजपमध्ये आलेले आहेत त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय राहणार?

मतदानाची तारीख जवळ येत असतांना अशा प्रकारची दुही माजविणे पक्षासाठी धोक्याचे असतांनाही तसे होणे म्हणजे ‘आतू’न बळ मिळत असल्याची शंका आहे. मध्यंतरीच्या काळात पक्षापासून दूर गेलेले ए.टी. पाटील दोन दिवसांपासून चांगलेच सक्रिय झालेले आहेत. त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी काही ठिकाणी होतही असेल मात्र त्याला श्रेष्ठींचा नकारच आहे. अर्थात ‘ए.टीं’ना उमेदवारी द्याना… अनेकांची ‘ना…ना’! अशी गत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.