शिवसेनेचे माजी खा. आनंदराव अडसूळ यांच्या घरी ईडीचं पथक दाखल

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना सिटी बँक कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने समन्स बजावलं आहे. आमदार रवी राणा यांनी अडसूळ यांच्यावर मुंबईतील सिटी बँकेत ९८० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी तक्रार देखील केली होती. या पार्श्वभूमीवर ईडीने अडसूळ पिता-पुत्रांना समन्स बजावलं आहे.

काही दिवसांपूर्वी या प्रकरणी खासदार अडसूळ यांच्यासह मुलगा आणि जावयाच्या घरांवर ईडीचे छापे पडले होते. आनंदराव अडसूळ यांनी सिटी बँकेत भ्रष्टाचार करत सर्वसामान्य ठेवीदार, गोरगरीब नागरिक, ज्येष्ठ पेंशनधारक यांची आयुष्यभराची जमा रक्कम आणि गिरणी कामगारांचे पैसे परस्पर लाटल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. मात्र, हे आरोप खासदार अडसूळ आणि त्यांच्या मुलाने फेटाळून लावले आहेत.

आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांनी सांगितलं की, आमदार रवी राणा यांच्यावर गंभीर आरोप केले. या प्रकरणाशी संबंधित माहिती रवी राणा यांनी पेरली आहे. सुरुवातीला अटक झाल्याची बातमी पसरवली. मात्र, अटक झालेली नाही, असं अभिजीत अडसूळ म्हणाले. रवी राणा यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना पैशांच्या, राजकीय दबावाखाली ठेवलं आहे, असा आरोप अभिजीत अडसूळ यांनी केला.

सिटी बँकेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार सर्वप्रथम आनंदराव अडसूळ यांनी एन. एम. जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तसंच आर्थिक गुन्हे शाखेमध्ये जाऊन तक्रार केली आहे. यामध्ये त्यांनी कशाप्रकारे आणि कोणी कोणी घोटाळा केला आहे, याचा उल्लेख केला आहे, असं अभिजीत अडसूळ यांनी सांगितलं.

आनंद अडसूळ यांची दोन ते अडीच तास ईडीनं चौकशी केल्यानंतर त्यांच्या घराची तपासणीही केली होती. नोटीस बजावल्यानंतर त्यांच्या घरी ईडी पोहोचली. दरम्यान, सोमवारी सकाळी अडसुळांच्या मुंबईतील घरी ईडीचं पथक दाखल झालं असून, यामध्ये महिला आणि पुरुष अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले.

सोमवारीच अडसूळ यांना ईडी कार्यालयात हजर होण्यास सांगण्यात आलं आहे. सिटी को ऑपरेटीव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी सुरु आहे. असं असतानाच अडसूळ पिता- पुत्रांना अटक होणार का, हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ईडीच्या हाती त्यांच्याविरोधातील सबळ पुरावे लागल्यास अडसूळ यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली जाऊ शकते असं म्हटलं जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.