पोलिसांच्या सतर्कतेने नरबळीचा कट फसला

0

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथे गुप्तधनाच्या लालसेपोटी  एका मांत्रिक महिलेच्या मदतीने दोघांनी नरबळी देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी घरात पूजा-अर्चा झाल्यानंतर पौर्णिमेला नरबळी देण्याचे नियोजन करण्यात आले होते. दरम्यान, नरबळी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना व एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या सतर्कतेने नरबळीचा कट फसला.

जाफराबाद तालुक्यातील डोणगाव हे निजामकालीन गाव असून याठिकाणी बाजारपेठ आहे. येथील जुन्या घरांमधे गुप्तधन असल्याची चर्चा सुरु असते. गुप्तधनाच्या लालसेपोटी संतोष पिंपळे व गावातील जीवन पिंपळे यांनी घरातील गुप्तधन काढण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी दोघांनी बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील उंबरखेड येथील एका मांत्रिक महिलेला बोलावले होते.

या घरात गुप्तधन असल्याचे त्या महिलेने संतोष पिंपळे यांना सांगितले. गुप्तधन मिळवण्याच्या लालसेतून या दोघांनी नरबळी देण्याचे नियोजन केले. संतोष पिंपळे यांनी त्यांची पत्नी सीमा पिंपळे हिला गुप्तधन असल्याच्या जागेची पूजाअर्चा करण्यास सांगितले. मात्र तिने नकार दिला. त्यामुळे तिला तिच्या पतीने मारहाण केली. मारहाण झाल्यामुळे सिमा पिंपळे तिच्या माहेरी निघून गेली व तिने हा प्रकार तिच्या वडीलांना सांगितला. तिच्या वडीलांनी सर्व प्रकार टेंभुर्णी पोलिस स्टेशनला जावून कथन केला. स.पो.नि. रविंद्र ठाकरे यांनी तातडीने पावले उचलत पथकासह डोणगाव गाठले.

घटनास्थळावर आढळून आलेले जादूटोण्याच्या साहित्यासह जीवन पिंपळे व संतोष पिंपळे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. तसेच मांत्रिक महिलेला देऊळगावराजा तालुक्यातील उंबरखेड येथून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुप्तधनासाठी होणारा नरबळी अशा प्रकारे टळला. सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे, पोलिस उपनिरीक्षक सतीश दिंडे, किरण निर्मल, पंडित गवळी, गणेश पवार, गजेंद्र भुतेकर, महिला पोलिस छाया निकम आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.