ॲड. उज्ज्वल निकम आहेत कोट्यवधींचे धनी !

म्युच्युअल फंड, आलिशान फ्लॅट अन्‌ जमिनी

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क 

ज्येष्ठ विधिज्ञ आणि भाजपकडून उत्तर-पूर्व मतदारसंघाचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्याकडे एकूण 27.70 कोटी रुपये इतकी स्थावर आणि जंगम मालमत्ता असून वारसाहक्काने आलेली 4.35 कोटी रुपयांची संपत्ती आहे. मुलगा अनिकेत याला निकम यांनी 6.95 कोटी रुपयांचे कर्ज दिले असून त्यांच्यावर एकूण 37.09 लाख रुपयांचे कर्ज आहे.

निकम यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरला. त्यासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीचा तपशील दिला आहे. यात निकम यांच्याकडे 11.35 लाख रुपयांची रोख रक्कम असून वारसाहक्काने आलेली 22.41 लाख रुपये रोख आहे. तसेच निकम यांची पत्नी ज्योती यांच्याकडे 27 हजार 871 रुपयांची रोख रक्कम आहे. निकम यांनी विविध म्युच्युअल फंडमध्ये 5.07 कोटी रुपये गुंतवले असून त्यांच्या पत्नीने 1.31 कोटी रुपये गुंतवले आहेत. निकम यांच्या कुटुंबीयांकडे पाथर्डी, पिंपळाड, गंगापूर (नाशिक), मंगरुळ (औरंगाबाद), चोपडा (जळगाव) येथे जमिनी आहेत.

निकम यांच्याकडे अंधेरी, दहिसर आणि जळगाव येथे तसेच मचाळे, जळगाव येथे वारसाहक्काने मिळालेला फ्लॅट आहे. तर त्यांच्या पत्नीकडे माहीम येथील एका फ्लॅटवर 50 टक्के मालकी आहे. एकूणातच निकम यांच्याकडे स्वतःची 17 कोटी 45 लाख 95,005 रुपये, तर वारसाहक्काने मिळालेली 1 कोटी 67 लाख 52, 655 रु. इतकी जंगम मालमत्ता आहे. तर स्वतःची 10 कोटी 24 लाख 76,978 रु. आणि वारसाहक्काने 2 कोटी 86 लाख 43,568 रु. मूल्य असलेली स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी ज्योती यांच्याकडे 2 कोटी 95 लाख 50,070 रु. इतकी जंगम, तर 8 कोटी 46 लाख 11,910 रु. मूल्य असलेली स्थावर मालमत्ता आहे. उज्ज्वल निकम यांच्यावर 37 लाख 9,452 रु. इतके तर ज्योती यांच्यावर 5 कोटी 74 लाख 42,236 रु. इतके कर्ज आहे.

यामिनी जाधव यांच्या मालमत्तेत वाढ

यामिनी जाधव यांच्या स्थावर मालमत्तेत पाच वर्षांत दुपटीने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यामिनी जाधव यांनी 2019 साली भायखळा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्याच्या तुलनेत त्यांची जंगम मालमत्ता मात्र 2024 साली कमी झाल्याचे दिसून आले आहे. तसेच यामिनी जाधव यांची प्राप्तिकर विभागाकडून चौकशी सुरू असून त्यात 2.88 कोटी रुपयांची वसुली असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याविरोधात यामिनी अपिलात गेल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.