अजित पवारांची विधानसभेत मोठी घोषणा, 31 जुलै 2021 पर्यंतच्या एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार

0

मुंबई

राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. आणि  सुरुवातीलाच विरोधकांनी  एमपीएससी आणि स्वप्निल लोणकरच्या  आत्महत्येवरुन सरकारला चांगलंच  धारेवर धरलं. विरोधी पक्षनेत्यांच्या म्हणण्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी मोठी घोषणा केली. 31 जुलै 2021 पर्यंतच्या एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरु, अशी घोषणा अजित पवार यांनी विधानसभेत केली.

स्वप्निल लोणकरच्या आत्महत्या प्रकरणावरून कामकाजाच्या सुरुवातीलाच विधानसभेत जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर सुरुवातीलाच हल्ला चढवला. अधिवेशनात विरोधकांनी एमपीएससीवरून सरकारला कोंडीत घालण्याचा प्रयत्न केला. लाखो पोरांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, अशा वेळी सरकार नेमकं काय करत आहे ? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उभे राहिले. त्यांनी 31 जुलै 2021 पर्यंतच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.

यापूर्वी  भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येवरून राज्य सरकारवर टीका केली. स्वप्निल लोणकरच्या आईची व्हिडीओ क्लिप तुम्ही विधानसभेच्या स्क्रीन वर लावा, दगडाचं हृदय असलेल्या व्यक्तीला देखील पाझर फुटू शकतो, या सरकारला पाझर फुटेल का? असा सवाल विचारत त्यांनी स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची मदत करण्याची मागणी सरकारकडे केली. मुनगटीवारांची या मागणीवर देखील सरकार सकारात्मक विचार करेल, असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं.

आज विधिमंडळात  स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येचे पडसाद  उमटलेले पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत सरकार एमपीएससीवर काय पावलं उचलणार आहे, हे जाहीर करावं, असं आव्हान दिलं. तसंच सुरुवातीलाच स्वप्निल लोणकरची सुसाईड नोट फडणवीसांनी सभागृहात वाचून दाखवली. ही सुसाईट नोट अतिशय संवेदनशील आहे. कोणाच्याही हृदयाला पाझर फुटेल असं हे पत्र आहे. सरकारला पाझर फुटणार आहे की नाही?, असं विचारत सगळं कामकाज बाजूला ठेऊन एमपीएससीवर त्वरित चर्चा घ्यावी, असं फडणवीस म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.