यावल कृउबा समितीत भाजपा, शिवसेना, रिपाई महायुतीने महाविकास आघाडीचा केला दारुण पराभव

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

यावल (Yawal) कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीत भाजपा, शिवसेना (ShivSena), रिपाई, महायुतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार शिरीषदादा चौधरी पुरस्कृत महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. बाजार समितीच्या एकूण 18 जागांपैकी 15 जागांवर भाजपा, शिवसेना, युतीने आपला झेंडा कायम ठेवला. तर महाविकास आघाडीचे फक्त 3 उमेदवार निवडून आल्याने महाविकास आघाडीला मोठा राजकीय धक्का बसला आहे. भाजपाने सतत चौथ्या पंचवार्षिक निवडणुकीत यावल कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व सिद्ध केले यामुळे आता विधानसभा, लोकसभा निवडणुकीचा प्राथमिक अंदाज सुद्धा यावल, रावेर तालुक्यातील जनतेने घेतला असल्याचे बोलले जात आहे.

भाजपाचे पाणीपुरवठा मंत्री गिरीशभाऊ महाजन (Girishbhau Mahajan), पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), आमदार राजू मामा भोळे (Raju Mama Bhole) यांच्या नेतृत्वाखाली अमोलदादा हरिभाऊ जावळे, हिरालाल भाऊ चौधरी, विलास चौधरी, शरददादा महाजन, पुरुजीत चौधरी, दीपक अण्णा पाटील, रवींद्र पाटील, अतुल भालेराव, डॉ.कुंदन फेगडे, डॉक्टर सुनील पाटील पांडुरंग सराफ इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपा शिवसेना रिपाई महायुती प्रणित सहकार पॅनलचे नेतृत्व करीत निवडणूक प्रचाराचे नियोजन करून बाजार समिती निवडणुकीत 18 पैकी 15 जागा निवडून आणल्या त्याबद्दल त्यांचे व सर्व विजयी उमेदवारांचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.

यावल कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीत सहकारी संस्था सर्वसाधारण 7 जागा, सहकारी संस्था इतर मागासवर्गीय 1, सोसायटी मतदारसंघ महिला राखीव 2, सहकारी संस्था भटक्या विमुक्त जाती जमाती 1, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदार संघ 1, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल मतदार संघातून 1, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातून 2 अशा एकूण 15 जागांवर भाजपा शिवसेना रिपाई महायुती प्रणित सहकार पॅनल मधील उमेदवारांनी विजय प्राप्त केला.

महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास पॅनलने व्यापारी मतदारसंघातील 2 , हमाल मापारी तोलारी मतदारसंघातील 1 अशा फक्त 3 जागांवर विजय मिळविला. महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अनिल साठे, जळगाव जिल्हा बँकेचे संचालक विनोद कुमार पाटील, यावल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे, बाजार समितीचे माजी सभापती भानुदास दगडू चोपडे, केतन किरंगे, अनिल प्रल्हाद पाटील, आमदार शिरीषदादा चौधरी यांचे कट्टर समर्थक तथा पंचायत समितीचे माजी सदस्य शेखर सोपान पाटील, इत्यादी मातंबर उमेदवारांचा पराभव झाला.

भाजप, शिवसेना, रिपाई, महायुती प्रणित सहकार पॅनल मधील एकूण 15 विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे-पाटील हर्षल गोविंदा, चौधरी दीपक नरोत्तम, पाटील, उमेश प्रभाकर, फेगडे राकेश वसंत, महाजन सागर राजेंद्र, चौधरी पंकज दिनकर, पाटील संजय चुडामण हे 7 उमेदवार सहकारी संस्था सर्वसाधार मतदारसंघातून विजयी झाले आहेत. सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मतदार संघातून चौधरी नारायण शशिकांत, सहकारी संस्था महिला राखीव मतदार संघातून फालक कांचन ताराचंद, बराटे राखी योगराज सोसायटी मतदार संघ विमुक्त भटक्या जाती जमाती मतदार संघातून राजपूत उज्जैनसिंग भावलाल, तर ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून कोळी बबलू उर्फ दगडू जनार्दन. ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदार संघातून तळेले यशवंत माधव, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून पाटील विलास चंद्रभान, पाटील सूर्यभान निंबा

महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास पॅनल मधून व्यापारी मतदारसंघातून चौधरी अशोक त्र्यंबक, सय्यद युनूस सय्यद यूसुफ,तर हमाल मापाडी तोलारी मतदारसंघातून बारी सुनील वासुदेव हे फक्त 3 उमेदवार महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास पॅनल मधून विजयी झाले आहेत. 2 मताचा फरक पडल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे 25 हजार रुपये शासकीय फी भरून पुन्हा मतमोजणी- ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघात महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास पॅनल मधील पंचायत समितीचे माजी सदस्य तथा आमदार शिरिदादा चौधरी यांचे कट्टर समर्थक पदाधिकारी शेखर सोपान पाटील यांना 293 आणि भाजप शिवसेना रिपाई महायुती प्रणित सहकार पॅनलचे उमेदवार पाटील सूर्यभान निंबा यांना 296 मते मिळाल्याने तीन मतांचा संशय आल्याने पुन्हा मतमोजणी झाली त्यात आधी विजयी घोषित केलेले पाटील सूर्यभान निंबा हेच विजयी असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडणे कामे प्रामुख्याने यावल तहसीलदार महेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी पी.एफ.चव्हाण व त्यांचे सहकारी कर्मचारी पंचायत समिती कर्मचारी यांनी चोखपणे आपले कर्तव्य पार पाडले तर पोलिसांनी आपला पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.