वाळू माफियांची मुजोरी… कारवाई दरम्यान तलाठ्याला लोटून देत ट्रॅक्टर ट्रॉलीसह पसार…

0

 

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

एरंडोल येथील तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्या पथकाने उमर्दे येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर वीटभट्टी नजिक मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडले. कारवाई सुरु असताना ट्रॅक्टर मालक व चालक नाना उत्तम कोळी रा. खर्ची या आरोपीने पथकातील तलाठी सुधीर मोरे यांना लोटून देत ट्रॅक्टर व ट्रॉली सह पलायन केले. या प्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, एरंडोल येथील तहसीलदार सुचिता चव्हाण, विश्वंभर शिरसाठ, श्रीकांत कासुंदे, सुधीर मोरे यांचे पथक गौण खनिज कारवाईसाठी एरंडोल-म्हसावद रस्त्याने सरकारी वाहनाने निघाले, जातांना तहसीलदार चव्हाण यांना ट्रॉली मध्ये रेती भरलेले ट्रॅक्टर आढळले, त्या वाहनास थांबवून चालकाकडे परवान्याबाबत विचारणा केली असता, चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. सदर ट्रॅक्टर एरंडोल पोलिस स्टेशन ला घेवुन चला असा आदेश तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी पथकातील कर्मचाऱ्यांना केला. म्हणून मोरे हे ट्रॅक्टर वर बसले, ट्रॅक्टर एरंडोल कडे जात असताना अचानक वीटभट्टी जवळ थांबवण्यात आले. तेव्हा ट्रॅक्टर मालक नाना उत्तम कोळी हा एम्.एच.०२ बी. ई.९२३४ क्रमांकाच्या कार ने पाठलाग करीत आला, त्याने चालकास ट्रॅक्टर वरुन खाली उतरवून तो स्वतः ट्रॅक्टर चालविण्यासाठी बसला. उमर्दे गावाजवळ कोळी याने ट्रॅक्टर वर बसलेले मोरे यांना खाली ढकलून दिले व ट्रॉली सह ट्रॅक्टर घेवुन पोबारा करीत पलायन केले. दरम्यान या प्रकरणाचा सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे, अनिल पाटील, मिलींद कुमावत, दत्ता ठाकरे, अकील मुजावर हे पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.