अंजनी धरण परीसरात अवैध उत्खनन करणारे ३ वाहने महसूल विभागाकडून जप्त..!

0

 

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

एरंडोल येथून थोड्या अंतरावर असलेल्या अंजनी धरण परीसरात मुरुमाचे अवैध उत्खनन करतांना महसूल प्रशासनाने दोन ट्रॅक्टर व एक जेसीबी अशी तिन वाहने ३जुलै २०२३ रोजी रंगेहाथ पकडली. पंकज राजमल नेरकर यांनी दिलेल्या लेखी तक्रारीची तात्काळ दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली. सदर वाहने एरंडोल पोलिसाच्या ताब्यात देण्यात आली आहेत. एम.एच.१९ सी.झेड ६६८३, एम.एच.१९ सी.झेड ५७३६ ट्रॅक्टर तर एम.एच.१९ इ.ए.६३२० क्रमांकाच्या जेसीबीचा यात समावेश आहे.

एरंडोल येथे झालेल्या पावसामुळे कॉलनी परिसरातील कच्च्या रस्त्यांवर मोठया प्रमाणात चिखल झाल्यामुळे डागडुजी करण्यासाठी मुरूम पुरवठा व्हावा अशी मागणी न.पा. प्रशासनाने तहसीलदार, गिरणा पाटबंधारे व प्रांताधिकारी यांच्याकडे केली. दरम्यान, रॉयल्टी न भरता निव्वळ परवानगी वर मोठया प्रमाणात मूरुमाचे अवैध उत्खनन करून वाहतूक केली. सदर खोदकामामुळे धरणाच्या भिंतीला क्षती पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी लेखी तक्रार पंकज राजमल नेरकर यांनी उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड व तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्या कडे केली. महसूल प्रशासनाने तक्रारीची तातडीने दखल घेऊन मंडळाधिकारी उदय निंबाळकर व तलाठी सलमान तडवी यांना पाठवून तिन्ही वाहने जप्त केली व पोलिस स्टेशन ला जमा करण्यात आली.

अवैध उत्खनन व वाहतूक किती प्रमाणात झाली याचा पंचनामा करण्यात आला. २००फुट लांब,८०फुट रुंद, ५ते ६ फुट खोल एवढ्या प्रमाणात उत्खनन झाल्याचा पंचनामा करण्यात आला. माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, राहूल महाजन यांनी यावेळी पंच म्हणून काम पाहिले.

 

गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी आम्ही करत आहोत. – दशरथ बुधा महाजन (जिल्हा उपप्रमुख उ.बा.ठा.शिवसेना)

 

मुख्याधिकारी यांच्या मागणीनुसार परवानगी देण्यात आली. यात काही गैर व्यवहार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. – एस.आर.पाटील (उपविभागीय अधिकारी, गिरणा पाटबंधारे उपविभाग,एरंडोल)

Leave A Reply

Your email address will not be published.