डिझेल चोरी..सिनेस्टाईल पकडले पिकअप; मात्र चोरटे पसार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

उस्मानाबाद : तालुक्यातील तेर गावात आडत दुकानासमोर थांबलेल्या ट्रकमधील डिझेल चोरी करीत असताना आढळून आलेल्या चोरट्यांचा ग्रामस्थांनी दुचाकी अन्‌ चारचाकी वाहनाद्वारे पाठलाग केला. परंतु, हिंगळजवाडी गावानजीक चोरट्यांनी पीकअप जागेवर सोडून पोबारा केला. यादरम्यान, चोरट्यांनी ग्रामस्थांवर अन्‌ ग्रामस्थांनी चोरट्यांवर दगडफेक केली. चोरटे अन्‌ ग्रामस्थांमधील हा थरार सुमारे तीन तास सुरू होता. ही घटना सोमवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली.

सोमवारी पहाटेच्या सुमारास तेर येथील नवीन ग्रामपंचायतीजवळ असलेल्या दंडनाईक यांच्या आडत दुकानासमोर सोयाबीन भरलेला एक ट्रक उभा होता. पहाटे दोन वाजेच्या सुमारास तिघे चोरटे या ट्रकमधील डिझेल चोरण्याचा प्रयत्न करीत असतानाच ट्रकमध्ये झोपलेल्या चालकाला याची चाहूल लागली. त्यामुळे त्यांनी तातडीने फोन करून गावातील इतर युवकांना याची कल्पना दिली.

यानंतर काही वेळातच पाच-सात युवक तेथे दाखल झाले. युवकांना पाहताच यातील दोघांनी पळ काढला तर तिसरा पिकअप घेऊन बसस्थानकाकडे गेला. युवकांनी परिसरात चोरट्यांचा शोध घेतला. मात्र, ते सापडले नाहीत.

दरम्यान, हे युवक गावात या घटनेची चर्चा करीत थांबलेले असतानाच काही वेळाने पुन्हा हा पिकअप तेथे दाखल झाला. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी परत दुचाकी आणि चारचाकी वाहनातून या पिकअपचा पाठलाग सुरू केला. संत गोरोबाकका मंदिरापर्यंत पाठलाग केल्यानंतर हे पिकअप उस्मानाबादच्या दिशेने वळाले. यावेळी ग्रामस्थ आणि चोरटे एकमेकांवर दगडफेक करीत होते. ही घटना थरकाप उडवणारी होती.

दरम्यान, चोरट्यांनी तेर गावापासून साधारण चार किमी अंतरावर हिंगळजवाडी गावाजवळ पिकअप सोडून पोबारा केला. यावेळी रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिसांनी हे पिकअप ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आनले. याचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

गाडीत चटणी पावडर, कोयता अन्‌ काठ्याही

यावेळी चोरटे व ग्रामस्थ एकमेकांवर दगडफेक करीत अतसाना चोरट्यांच्या पिकअपचा पुढचा काच फुटला. परंतु, चोरट्यांनी पिकअप तसेच पुढे नेले. हा पिकअप ताब्यात घेतल्यानंतर आतमध्ये चटणी पावडर, कोयता, काठ्या व चोरी करण्याचे इतर साहित्य देखील होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.