अचानक पेट घेतल्याने ट्रक अवघ्या काही मिनिटात खाक…

0

 

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

तालुक्यातील वेले आखतवाडे येथील बस स्टॅन्ड परिसरात १८ मे रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास धावत्या ट्रकने अचानक रस्त्यावर पेट घेतला. त्यामुळे वेले ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ माजली. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. लागलेल्या आगीत अक्षरशः ट्रक संपूर्ण जळून खाक झाला.

ट्रक क्रमांक एम एच ०४  डी एस ६६०९ हा ट्रक बऱ्हाणपूर कडून  मालेगाव कडे जात असताना वेले येथील बस स्थानकासमोरच या धावत्या ट्रकने अकस्मात पेट घेतला. वेले गावाचे बस स्थानक गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यानेच ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत जेसीबीच्या मदतीने आग गावात पसरणार नाही अशा सुरक्षित स्थळी ढकलत नेऊन पलटी केला. तो पर्यंत ट्रकला लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले होते. ट्रकमध्ये ज्वलनशील केमिकलच्या प्लॅास्टिक टाक्या असल्याने आग एवढी भयंकर होती की काही मिनिटातच ट्रक रस्त्यावरच जळून खाक झाला.

बसस्थानकासमोरच दुकाने, रेस्टॉरंट, कटिंग सलून तसेच दाट लोकवस्ती असल्याने मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता होती. परंतु ग्रामस्थांच्या सहकार्याने व सतर्कतेने जेसीबीने ट्रक ढकलत नेत आग गावात पसरणार नाही अशा ठिकाणी रस्त्याच्या कडेला पलटी केला. याप्रसंगी गावकऱ्यांच्या समय सुचकतेमुळे आग आजूबाजू पसरली नाही. जर आग दुकान किंवा घरापर्यंत पोचली असते तर मोठी दुर्घटना होण्याची भीती होती. आगग्रस्त ट्रकमध्ये केमिकलचे ड्रम व इतर काही सामान असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ड्रम मुळे आग झपाटाने वाढल्याचे बोलले जात आहे सुदैवाने यावेळी कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

याप्रसंगी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांनी घटनास्थळी दाखल होऊन भेट दिली. चोपडा येथील अग्निशामक दलाच्या सदोष पूर्ण  गाड्या उशिराने घटना स्थळी पोहचल्याने वेले ग्रामस्थांनी तीव्र स्वरूपाचा रोष करत संताप व्यक्त केला. जेसीबी चालक अमोल भालेराव याचे धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ट्रक चालक व क्लिनरला वाचवण्यात वेले ग्रामस्थांना यश आले. वेले ग्रामस्थांमधील समयसूचकता, सहकार्याची भावना,सातत्याने मदतीसाठी धावून जाण्याच्या वृत्तीमुळे भयंकर अनर्थ टळला.

Leave A Reply

Your email address will not be published.