कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या होणार

0

बंगळुरू , लोकशाही न्यूज नेटवर्क
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल यांनी कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे होणार असल्याचे निश्चित  पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली. डी.के.शिवकुमार हे देखील मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही होते, मात्र त्यांचे मन परिवर्तन करत त्यांना उपमुख्यमंत्रीपदासाठी तयार करण्यात आले आहे.

कर्नाटकात फक्त एकच उपमुख्यमंत्री असेल असे सांगण्यात आले आहे. याशिवाय शिवकुमार हे लोकसभा निवडणुकीपर्यंत प्रदेशाध्यक्ष असतील असेही सांगण्यात आले आहे.

सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात सत्तेसाठीच्या संघर्षामुळे काँग्रेस पुन्हा राजकीय संकटात सापडणार का ? असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. कर्नाटकातील हा पेच दूर करण्यासाठी सिद्धरामय्या आणि डी.के.शिवकुमार या दोघांनीही दिल्लीत जाऊईन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. जवळपास 100 तास कर्नाटकापासून दिल्लीपर्यंत यावरून खल सुरू होता. अखेर या चर्चेनंतर सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आणि कर्नाटकातील पेच सुटला. 20 तारखेला कर्नाटकमध्ये सरकार स्थापन होईल.

काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला नव्हता. यामुळे पक्षात आधीपासूनच कुरबुरी सुरू होत्या. सिद्धरामय्या आणि शिवकुमार या दोघांनी वेळोवेळी मुख्यमंत्रीपदावर आपला दावा ठोकला होता. निवडणुकीतील विजयानंतर तर या दोघांनी आपले दावे आणखीनच मजबूत केले होते. हे सगळं प्रकरण हाताबाहेर जाऊ नये यासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हस्तक्षेप केला आणि सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना समजावण्याची भूमिका घेतली. त्यांच्या हस्तक्षेपामुळे शिवकुमार यांनी नमते घेत मुख्यमंत्रीपदाचा हट्ट तूर्तास सोडला आहे. मात्र त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्यानुसार कर्नाटकात एकच उपमुख्यमंत्री पद ठेवणे आणि 2024 च्या लोकसभा निवडणुका होईपर्यंत शिवकुमार यांनाच प्रदेशाध्यक्ष ठेवणे, या मान्य करण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.