चीनचे चांद्रयान ‘चांग-६’ झेपावले

0

बीजिंग: -चीनने ‘चांग-६’ नामक आपल्या चांद्रयानाचे शुक्रवारी यशस्वी प्रक्षेपण केले. हे यान चंद्राच्या कायम अंधारात राहणाऱ्या पृष्ठभागावर उतरणार असून तेथील दगड-मातीचे नमुने घेऊन ते पृथ्वीवर परत येईल. चंद्राच्या या भागावर भारताने चांद्रयान-३ मोहिमेद्वारे सर्वप्रथम यान उतरवून यापूर्वीच इतिहास रचला आहे. चीन आता तेथील नमुने आणून पुढील पाऊल टाकण्यासाठी प्रयत्नशील आहे.

चीनच्या हेनान प्रांतातील वेचांग अंतराळ प्रक्षेपण केंद्रावरून शुक्रवारी लाँग मार्च-५ वाय ८ रॉकेटद्वारे चांग-६ चांद्रयान झेपावले. या यानाचे ऑर्बिटर, लँडर, अॅसेंडर आणि री-एन्ट्री मॉड्युल असे चार भाग आहेत. यान चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर ऑर्बिटर त्यापासून वेगळे होईल आणि पृथ्वीच्या या उपग्रहावर उतरेल. चंद्राची एक बाजू कायम अंधारात असते. तिथे कधीच सूर्यप्रकाश पोहोचत नाही. या अंधारातील पृष्ठभागावरून दगड-मातीचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणणे हा चीनच्या या मोहिमेचा उद्देश आहे.

चंद्रावर उतरलेल्या लँडरने गोळा केलेले नमुने घेऊन अॅसेंडर ऑर्बिटरपर्यंत पोहचेल. तेथे हे नमुने री-एन्ट्री मॉड्युलमध्ये एकत्रित करण्यात येतील आणि हे मॉड्युल पृथ्वीवर येईल. ही संपूर्ण मोहीम ५३ दिवसांची आहे. चीनने यापूर्वी चंद्रावर यान, रोव्हर उतरवले आहेत. चांग-५ मोहिमेद्वारे चंद्रावरून मातीचे नमुने देखील आणण्यात आले आहेत. चंद्राच्या अंधारातील बाजूवरील संशोधनासाठी चीनची ही पहिलीच मोहीम आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.