मनपा तर्फे शहर बस सेवा सुरू करण्याची मागणी

0

लोकशाही संपादकीय लेख

गेल्या दहा वर्षापासून जळगाव शहरातील नागरिक, विद्यार्थी, कामगार आदींसाठी प्रवास करण्याकरिता असलेली शहर बससेवा बंद पडली आहे. त्याआधी महानगरपालिकेच्या वतीने आणि तत्पूर्वी नगरपालिका असताना शहरात स्वस्तात आणि सुरक्षित बस वाहतुकीच्या दृष्टीने शहर बसेसची सेवा कार्यरत होती. नगरपालिका असताना पालिकेतर्फे राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचा उपयोग शहरातील वाहतुकीसाठी केला जात होता. जो काही तोट्याचा बोजा महामंडळावर पडत असे, तो बोजा नगरपालिकेतर्फे अथवा महानगरपालिकेतर्फे भरून महामंडळाला दिला जात असे. महानगरपालिकेच्या अनेक नागरी सुविधांपैकी शहरातील नागरिकांची स्वस्त दरात, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात ही सेवा पुरवली जायची. काही वर्षापूर्वी महानगरपालिकेतर्फे खाजगी कंत्राटदाराला शहर बसेस चालवण्याचा ठेका दिला होता. त्याबदल्यात खाजगी ठेकेदाराकडून अत्यंत चांगल्या पद्धतीने बसेसची शहर वाहतूक केली जात होती. या खाजगी ठेकेदाराने सर्व शहर बसेसमध्ये महिला कंडक्टरची नेमणूक केल्यामुळे या महिला कंडक्टरकडून फार चांगली वागणूक शहरातील प्रवाशांना दिली जात होती. त्यावेळी शहर बस वाहतूक ठेकेदाराला त्याच्या बसेस रात्रीच्या वेळी कोठे थांबवायच्या? ही एक अडचण होती. तथापि ती अडचण काही महापालिकेतर्फे सोडवण्यात गेली नसल्यामुळे बसेस मधील पार्टसच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे खाजगी ठेकेदार त्रस्त झाले होते. त्यानंतर महापालिकेत सत्ता बदल झाला आणि त्याचा परिणाम या खाजगी ठेकेदाराला आपला गाशा गुंडाळावा लागला. तेव्हापासून ते आतापर्यंत शहरात बसेसची वाहतूक सेवा नसल्यामुळे शहरवासीयांची फार मोठी कुचंबना होत आहे. विशेषतः विद्यार्थी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिक यांचे फार मोठे हाल होत आहेत. जळगावचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. एका टोकावरून दुसऱ्या टोकाला जायचे म्हटले तर खाजगी ऑटो रिक्षावर पूर्णतः अवलंबून राहावे लागते. ऑटो रिक्षावाले मनमानी भाव सांगतात. जेणेकरून ते परवडणारे नसतात. त्यातच शेअर रिक्षामध्ये जायचे म्हटले तर रिक्षात किती प्रवासी कोंबतील त्याचा वाली कोणी नाही. औरंगाबाद, नाशिक, पुणे, ठाणे, नागपूर आदी ठिकाणी ऑटो रिक्षावाल्यांना मीटरची सक्ती केलेली आहे. मीटरचा वापर रिक्षावाल्याने केला नाही तर त्याला दंड होतो. जळगाव शहरात ऑटो रिक्षावाल्यांना मीटरची सक्ती आहे. पण तो रिकामा मीटर ऑटो रिक्षाला लावला की संपले. मीटर प्रमाणे जाण्यासाठी त्याचे भाडे निश्चित करून दिले जाते, परंतु आमच्या शहर वाहतूक शाखेला त्याचे काही घेणेदेणे नाही. ऑटो रिक्षा चालकांसाठी ठराविक ड्रेस कोडची सक्ती करण्यात आली पाहिजे. परंतु जळगाव ऑटो रिक्षा चालकांकडून ड्रेस कोडची ‘ऐसी की तैसी’ करून ठेवली आहे. कोण रिक्षा चालक आणि कोण प्रवासी हे समजायला मार्गच नसतो. तसेच रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या सुमारास उद्योग धंद्यावर कामाला जाणाऱ्या कामगारांची तसेच जळगावातून भुसावळ, पाचोरा, चाळीसगाव आणि नाशिकला अपडाऊन करणाऱ्या चाकरमान्यांना जो त्रास होतो त्याची कैफियत बिचारे मांडणार कुणाकडे? ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी त्यांची अवस्था झालेली असते. त्यातच रिक्षावाल्यांची मुजोरपणाच्या वागणुकीला नेहमी तोंड द्यावे लागते. त्यासाठी तर रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती बस स्थानक, एमआयडीसी परिसर येथे ठराविक वेळेला बसेसच्या फेऱ्या सुरू केल्या तर त्या बसेसच्या टायमिंग नुसार प्रवाशांना त्या ठिकाणी पोहोचता येईल.

अलीकडे जळगाव शहर झपाट्याने वाढते आहे. शहरापासून दूर अंतरावर रहिवासी कॉलनी झाल्या आहेत. आणि नव्याने त्यात भर पडत आहे. शहरापासून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नऊ ते दहा किलोमीटर अंतरावर आहे. विद्यापीठात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज विद्यापीठात जावे लागते. विद्यार्थ्यांच्या खिशाला परवडावे म्हणून ते शेअरिंग रिक्षाची वाट पाहत थांबतात. जोपर्यंत ऑटो रिक्षावाल्याचा कोटा पूर्ण होत नाही तोपर्यंत ती ऑटो रिक्षा रवाना होत नाही. कधी कधी अर्धा अर्धा तास प्रवासी कोटा पूर्ण व्हायची वाट पाहावी लागते. त्यामुळे वेळेचा अपव्य होतो. त्यासाठी अर्धा पाऊण तास आधीच ऑटो रिक्षा स्थळावर पोहोचावे लागते. एखाद दिवशी काही कारणास्तव उशीर झाला तर ऑटो रिक्षा वेळेआधीच निघून गेलेला असतो. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना द्राविडी प्राणायाम करावे लागते. औरंगाबाद, नाशिक, पुणे आणि ठाणे ही शहर जळगाव पेक्षा कितीतरी पटीने मोठी असताना तिथली ऑटो रिक्षा चालकांना जी शिस्त प्रशासनाने लावली आहे, ती वाखाणण्यासारखी आहे. तशी शिस्त जळगावात का लावली जाऊ शकत नाही? हे कळायला मार्ग नाही.. त्याचबरोबर वरील सर्व शहरात शहर बस वाहतूक सेवा सुद्धा नियमित आणि सुरळीतपणे सुरू आहे. त्यामुळे ऑटो रिक्षा चालकाने अथवा शहर बस सेवेने प्रवास करणाऱ्यांची फार मोठी सोय होते. एक बस चुकली तर लागलीच पाच मिनिटांनी दुसरी बस असते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत नाही. त्या धरतीवर जळगाव शहरात महानगरपालिकेच्या वतीने बस सेवा सुरू करावी. जो काही थोडा बहुत तोटा होईल तो तोटा शहरवासीयांसाठी महानगरपालिकेने उचलावा. परंतु शहर बस सेवा ही नागरी सुविधांपैकी एक सुविधा समजावे. जळगाव पासून नशिराबाद पर्यंत, जळगाव पासून आसोदा भादली पर्यंत, जळगाव ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव ते पाळधी, जळगाव ते शिरसोली आणि जळगाव ते कुसुंबा अशा पॉईंटवर शहर बस सेवा सुरू केली तर अनेकांची गैरसोय दूर होणार आहे. जळगाव पासून ते मोहाडी पर्यंत जळगाव आता विस्तारलेले आहे. जळगाव ते महाबळ कॉलनीत जाणाऱ्या येणाऱ्यांचा मोठा लोंढा आहे. औद्योगिक वसाहतीतील कामगार बिचारे सायकलवर अथवा मिळेल त्या खाजगी वाहनाने येतात. अनेक वेळा कामगारांच्या दुचाकीच्या अपघाताच्या घटना घडतात. या सर्व सर्वांवर उपाय म्हणजे शहर बस सेवा सुरू करणे.. जळगाव जिल्ह्याचे तरुण तडफदार आणि कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनी यात पुढाकार घेतला पाहिजे. महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांना जर सूचना दिल्या तर हा प्रश्न सहज सुटू शकतो…!

Leave A Reply

Your email address will not be published.