सुषमा अंधारेंच्या महाप्रबोधन यात्रेमुळे जळगाव शिंदे गटाच्या आमदारांचे वाढले टेन्शन..?

0

लोकशाही कव्हर स्टोरी 

* महाप्रबोधन यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

* सुषमा अंधारेंनी सभा गाजवल्या

* शिवसेना नेते शरद कोळींचा आमदारांवर घणाघाती हल्ला

* शरद कोळींवर जिल्हाबंदीचे आदेश

* जिल्ह्यात धरणगाव, पाचोरा,  एरंडोल येथे शरद कोळींवर गुन्हे

* मुक्ताईनगरच्या सभेला परवानगी नाकारली

* मुक्ताईनगरमध्ये सभेचे व्यासपीठ पोलिसांनी काढले

* मुक्ताईनगरात शिवसैनिकांची धरपकड व गुन्हे दाखल

* सुषमा अंधारेंना मुक्ताईनगरला जाण्यास पोलिसांचा मज्जाव

* सुषमा अंधारेंना जळगावात ठेवेले नजर कैदेस

* सुषमा अंधारेंनी घेतलेल्या ऑनलाईन सभेला अभूतपूर्व प्रतिसाद

* कायदा व सुव्यवस्थेसाठी मुक्ताईनगरची सभा रद्द : पालकमंत्र्यांचे म्हणणे

* अंधारेंना नटीची उपमा दिल्याबद्दल गुलाबरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेनेचा ठिय्या

दिनांक 1 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर हे चार दिवस जळगाव जिल्ह्यात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाप्रबोधन यात्रेने गाजले. महाप्रबोधन यात्रेच्या प्रमुख नेत्या तीन महिन्यापूर्वी उध्दव गटात दाखल झालेल्या सुषमा अंधारे यांच्या भाषणांनी गाजवली. जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे पाच आमदार शिंदे गटात गेल्याने या पाचही आमदारांच्या मतदार संघात महाप्रबोधन यात्रेने खळबळ उडवून दिली. पहिली सभा शिंदे सरकारमधील पाणी पुरवठा मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघाचील धरणगाव या तालुक्याच्या ठिकाणी झाली. सभेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. आमदार – खासदार जरी शिंदे गटाकडे असले तरी शिवसेनेवर आजही प्रेम करणारा सर्वसामान्य शिवसैनिक मात्र उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेकडे असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले. सुषमा अंधारेंनी धरणगावच्या सभेत मंत्री गुलाबराव पाटलांवर प्रश्नांचा भडीमार केला. अंधारेंच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देतांना गुलाबराव पाटलांची दमछाक झाली.

दरम्यान सुषमा अंधारे म्हणजे शिवसेनेतील तीन महिन्याचे बाळ आहे, राष्ट्रवादीतील हे पार्सल शिवसेनेत आल. त्यामुळे शिवसेना वाढण्याऐवजी बुडणार आहे. बाळासाहेब, उध्दवसाहेब आणि आदित्य ठाकरेंवर जहरी टीका करणाऱ्या अंधारेंचे वक्तव्य सर्वांना माहीत आहे. इतकेच नव्हे तर अंधारेंवर टीका करतांना गुलाबराव पाटलांची जीभ घसरली. सुषमा अंधारेंना सिनेमामधील नटीची  उपमा दिली. गुलाबराव पाटलांच्या आरोपांचा सुषमा अंधारेंनी खरपूस समाचार घेतला. उध्दव ठाकरेंवर टीका करणाऱ्या माझ्या सारख्या टीकाकारांना उध्दवठाकरेंविषयी पाझर फुटला तथापि 30 वर्षे शिवसेनेत राहून गलेलठ्ठ कमाई केली. परंतु तुम्हाला पाझर फुटण्याऐवजी पाठीत खंजीर खुपसलात, याला काय म्हणावे? असा सवाल अंधारेंनी केला.

सुषमा अंधारेंनी धरणगावची सभा जिंकली. धरणगावच्या सभेत गुलाबरावांवर केलेल्या आरोपांनी सर्वत्र चर्चेला उधाण आले. जिकडे तिकडे महाप्रबोधन यात्रा आणि सुषमा अंधारेंच्या भाषणाचीच चर्चा होती. अजूनही ते कवित्व संपलेले नाही. पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी अंधारेंना नटीची उपमा दिल्यामुळे जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर त्याचे वादळ उठले आहे. महिला वर्गामध्ये त्याबाबत तीव्र संतापाची लाट पसरली आहे. गुलाबराव पाटलांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवसैनिकांचे पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले. महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून निषेध होतोय.

एक महिला म्हणून तुम्ही माझ्यावर आरोप करीत असला तरी मी घाबरणार नाही. समोरा समोर संविधानिक पध्दतीने मी लढ्यास तयार आहे. तुमच्यासारखी असंविधानिक गलीच्छ भाषा मी वापरणार नाही. तुमच्या या वक्तव्याने तुमच्या सरंजामी माज दिसतोय. तथापि 2024 च्या निवडणुकीत तुमचा पराजय निश्चित असल्याने सुषमा दगडूराव अंधारे मार्फत होणार आहे हे मात्र निश्चित, असा आत्मविश्वास दाखवत सुषमा अंधारेंनी गुलाबरावांना सुनावलं.

महाप्रबोधन यात्रेआधी युवासेना नेते आदित्य ठाकरेंच्या सभेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आता महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यात उडालेली खळबळ हे पहाता उध्दव ठाकरेंचाही आता मैदान सज्ज झाल्याने स्पष्ट दिसेल. त्याचा परिणाम म्हणजे सुषमा अंधारेंवर घातलेली मुक्ताईनगर सभेची बंदी. अंधारेंना केलेली नजरकैद या बाबीमुळे सध्या तरी जळगाव जिल्ह्यात उध्दव गटाच्या शिवसेनेमध्ये चैतन्य दिसून येत आहे.

सुषमा अंधारेंनी सभा गाजवल्या. त्याचबरोबर या प्रबोधन यात्रेत सामील झालेले सोलापूरचे शिवसेना नेते शरद कोळी यांच्या प्रक्षोभक भाषणाने जिल्ह्याचे लक्ष वेधले. शिवसेनेच्या खास शैलीत गुलाबरावांसह शिंदे गटाच्या पाचही आमदारांवर कडाडून टीका केली. नव्हे तर त्यांचेवर हल्लाबोल केला. गुर्जर समाजाच्या संदर्भात वक्तव्य केले म्हणून प्रशासनाने शरद कोळींवर विविध आरोप लावले. प्रथम त्यांच्या भाषणावर बंदी घातली, सभेला उपस्थितच राहू नये असे पत्र दिले. त्यांचेवर गुन्हाही दाखल केला, त्यांना जिल्हाबंदी केली. त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. शरद कोळींना जिल्हा प्रशासनाने बंदी घातल्या असल्या तरी दुसऱ्या जिल्ह्यातून सोशल मिडिया शरद कोळींनी केलेल्या भाषणांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुषमा अंधारेंची नजर कैद आणि शरद कोळींवरील कारवाईने जिल्ह्यातील सर्वसामान्य शिवसैनिकात उद्रेक झाला. उध्दव ठाकरे गटाच्या हे पथ्यावर पडले. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांचे टेन्श वाढल्याचे स्पष्टपणे जाणवत होते.

धरणगावनंतर महाप्रबोधन यात्रेची सभा पाचोरा येथे झाली आणि तेथे मानसिंगका मैदानावर झालेल्य सभेत आमदार किशोर अप्पा पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. या सभेला किशोरअप्पांच्या चुलत भगिनी सौ. वैशाली सूर्यवंशी व्यासपीठावर उपस्तित होत्या हे विशेष. किशोर पाटलांनी पाचोऱ्याल भूखंडात कोट्यवधींचा मलिदा कसा खाल्ला, या सुषमा अंधारेंच्या आरोपाने सभा गाजली. या सभेनंतर सुषमा अंधारे या अंधारात असलेल्या आमच्यामुळे प्रकाशात आल्या. या  अडनावावरून केलेल्या किशोर अप्पांच्या आरोपाचाही अंधारेंनी पोलखोल केली.

शिंदे गटातील तिसे आमदार एरंडोल – पारोळा मतदारसंघातील चिमणराव पाटील यांच्या एरंडोल येथे झालेल्या प्रबोधान यात्रेच्या सभेत चिमणराव पाटलांवर हल्लाबोल केला. त्याचप्रमाणे चोपडा येथील शिंदे गटाचे आमदार सौ. सोनवणे यांची आमदारकी घालवली असा सवाल सुषमा अंधारेनी केला. चोपड्याची सभाही गाजवली. त्यानंतर पाचवी अणि शेवटची सभा मुक्ताईनगर येथे होणार होती. तथापि त्याच्या आदल्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेची कारणे पुढे करून जिल्हा प्रशासनाने मुक्ताईनगरच्या महाप्रबोधन यात्रेच्या सभेवर बंदी घोषित केली. याच दिवशी शिंदे गटाची सुध्दा सभा ठेवण्यात आली होती. दोन्ही सभेवर प्रशासनाने बंदी घातली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही शिंदे गटाची सभा रद्द केली. असे पालकमंत्र्यांनी जाहीर केले. तथापि महाप्रबोधन यात्रेची सभा घेणारच असा शिवसैनिकांचा आग्रह कायम होता. तथापि ती सभासुध्दा पोलिसांनी होऊ दिली नाही. सभेचा आग्रह धरणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले. सुषमा अंधारेंना नजर कैदेत ठेऊन मुक्ताईनगरला पोहचू दिले नाही. प्रशासनाच्या या निर्णयामुळे वातावरण तापले. महाप्रबोधन यात्रेला याचे श्रेय जाते.

दिनांक 9 ऑक्टोंबरपासून ठाणे येथून महाप्रबोधन यात्रेला सुरूवात होऊन त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. कोठेही कसलाही तणाव अथवा दोन गटात दंगल वगैरे काहीही झाले नसतांना महाप्रबोधनच्या सभेवर बंदी घालणे यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केला. चार दिवसांच्या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यातील वातावरण मात्र ढवळून निघाले. या महाप्रबोधन यात्रेने मात्र शिंदे गटातील आमदारांचे टेन्शन वाढल्याची चर्चा मात्र सर्वत्र ऐकायला मिळत होती.

 

– धों. ज. गुरव 

सल्लागार संपादक 

दै. लोकशाही, जळगाव 

Leave A Reply

Your email address will not be published.