आमदार राजू मामा भोळे यांच्या विधानाचा अन्वयार्थ

0

लोकशाही संपादकीय लेख

राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो, असे म्हणतात ते खरे आहे. जळगाव शहराचे गेले ३० वर्ष नेतृत्व करणारे माजी मंत्री सुरेश दादा जैन (Suresh Dada Jain) यांनी २०१४ साली जेलमध्ये असताना जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची शेवटची निवडणूक लढवली. विद्यमान भाजपचे आमदार सुरेश भोळे (Suresh Bhole) उर्फ राजू मामा भोळे यांनी त्यांच्या पराभव केला. त्यानंतर २०१९ साली दुसऱ्यांदा राजूमामा जळगाव शहर मतदार संघातून दुसऱ्यांदा भाजपचे आमदार म्हणून निवडून आले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) भाजप आणि तत्कालीन शिवसेनेची युती असल्याने त्या निवडणुकीत राजू मामा भोळे चांगल्या मताधिक्याने निवडून आले. त्यावेळी शिवसेनेतर्फे बंडखोरी झाली असती तरी राजू मामा निवडणूक जिंकणे कठीण गेले असते. परंतु शिवसेना-भाजप युतीचा धर्म पाळला गेला. त्याचा फायदा राजू मामांना झाला. निवडणुकीनंतर भाजप सेनेची युती फिसकटली आणि शिवसेनेने (ShivSena) काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) बरोबर युती करून उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांचे नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आणि अडीच वर्ष राज्य केले. जळगाव शहरावर खानदेश विकास आघाडीच्या माध्यमातून सुरेश दादा जैन यांचे नेतृत्वात २०-३० वर्षे नगरपालिका आणि महापालिकेत सत्ता होती २०१८ साली महापालिकेच्या निवडणूकीत भाजप आणि सुरेश दादांची युती करण्याच्या उद्दिष्टाने विद्यमान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि सुरेश दादा जैन यांच्या युतीची बोलणी सुरू होती. परंतु ऐनवेळी ती बोलणी फिस्कटली आणि भाजपने निर्विवाद सत्ता मिळवली. त्यावेळी महापालिकेची स्थिती अत्यंत वाईट होती. एक वर्षात जळगाव शहराच्या कायापालट करण्याचे आश्वासन गिरीश महाजन यांनी दिले. तसेच एक वर्षात शहराचा विकास झाला नाही तर, राजू मामांसाठी आमदारकीच्या निवडणुकीत मते मागायला येणार नाही, असे आश्वासन महाजन यांनी दिले होते. यावेळी आमदार राजू मामा भोळे यांच्या पत्नी सौ सीमा भोळे या सुद्धा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यावेळी आमदार राजू मामा भोळे यांनी पत्नी सीमा भोळे यांना महापौर करण्यासाठी गिरीश महाजनांकडे हट्ट धरला. पत्नी महापौर आणि मी शहराचा आमदार असलो तर डबल इंजिन द्वारे शहराचा झपाट्याने विकास करू, या राजू मामांच्या मागणीचा विचार करून बहुसंख्य भाजप नगरसेवकांचा विरोध पत्करून सीमा भोळींना महापौर केले. तथापि शहर विकासासाठीची विकासाची अपेक्षा दोघा पती-पत्नीकडून शक्य झाली नाही. मध्येच सीमा भोळे (Seema Bhole) यांच्या राजीनामाची मागणी झाली. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर कैलास सोनवणे यांच्या पत्नी भारती सोनवणे (Bharti Sonawane) महापौर झाल्या. महापालिका प्रशासनाला गती आली. परंतु भारती सोनवणे यांची कारकीर्द संपताच नवीन महापौर निवडणुकीत भाजपमध्येच बंड झाले. भाजपच्या फुटीर नगरसेवकांनी शिवसेनेशी हात मिळवणी करून जयश्री महाजन यांची महापौरपदी तर कुलभूषण पाटील यांची उपमहापौरपदी निवड होऊन महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला. इथेच भाजपचे शहर आमदार राजू मामा भोळे यांना नामुष्की पत्करावी लागली. शहराच्या विकासाचा सुद्धा मुद्दा घेऊन स्वपक्षीय भाजप नगरसेवकांनी बंड केले, हे विशेष होय. त्यामुळे भाजपचे बहुसंख्य नगरसेवक आमदारांनी राजूमामा भोळे यांच्यावर नाराजी व्यक्त केली.

गेल्या दहा वर्षापासून जळगाव शहराची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. सुरेश दादांची खान्देश विकास आघाडीच बरी होती, असे जळगावकर बोलू लागले. जळगाव शहराच्या विकासाची वाट लागली. रस्त्यांची चाळणी झाली. स्वच्छतेचे तीन तेरा झाले. पिण्याचे पाणी नियमित करणे सुद्धा महापालिकेला शक्य होत नाही.. जळगावकर कमालीचे संतापले आहेत. आता आगामी विधानसभा तोंडावर आलेली आहे. त्या निवडणुकीत जळगावकरांच्या समोर मते कोणत्या तोंडाने मागणार अशी परिस्थिती आमदार राजू मामा भोळे यांची झाली आहे. त्याकरिता आता त्यांना सुरेश दादा जैन यांची आठवण होते आहे. सुरेश दादांचे दातृत्व, त्यांची देण्याची भावना याबाबत गौरवोद्गार काढून मी प्रेरणा घेतोय, असे विधान करून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न पिप्राळ्याच्या रथोत्सवात राजू मामांनी केला असे म्हणावे लागेल. कारण पिप्राळ्याच्या रस्त्यांसाठी चार कोटींचा निधी देण्याचे राजू मामांनी घोषित केले. याचा अर्थ तो शासकीय निधी आहे जो पिप्राळाकरांना मिळणारच होता. त्यात आमदार राजू मामांचे योगदान काय? सुरेश दादांच्या दातृत्वाशी आमदार राजू मामांची तुलना होऊच शकत नाही. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची युती झाल्यास आमदार राजू मामांना ही निवडणूक जिंकणे कठीण जाणार आहे. त्यातच भाजपतर्फे जो सर्वे झाला त्यात विद्यमान भाजपच्या आमदारांमध्ये निवडणूक जिंकण्याचे संदर्भात जो निगेटिव्ह सर्वे आला आहे, त्यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर आणि भुसावळ विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळे आमदार राजू मामा भोळेंना आपले एकेकाळाचे प्रतिस्पर्धी सुरेश दादा जैन आता प्रेरणादायी नेतृत्व वाटायला लागले, हे विशेष. परंतु याचा अर्थ जनता एवढी खुळी नाही. तुम्ही कितीही रंग बदलले तर तुमच्या रंगात आता जनता मिसळेल का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची गरज आहे. सुरेश दादांनी अद्याप आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही. किंबहुना त्यांचा वारसाही अद्याप त्यांनी जाहीर केलेला नाही. त्यामुळे सुरेश दादांची प्रेरणा मी घेतोय असे विधान करून सहानुभूती मिळेल का? या प्रश्नाचे उत्तर काळच देईल…!

Leave A Reply

Your email address will not be published.