लोकसभेसाठी सुरेश दादांची भूमिका महत्त्वाची ठरणार..!

0

लोकशाही संपादकीय लेख 

लोकसभा निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शेवटच्या टप्प्यात १३ मे ला होणार आहे. १९ एप्रिल पासून निवडणूक अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. दरम्यान जळगाव व रावेर मतदार संघातील भाजप मधल्या दोन्ही उमेदवारांची घोषणा झालेली आहे. मविआचे उमेदवार अद्याप घोषित होणे बाकी आहे. त्यामुळे महायुती म्हणजे भाजपच्या उमेदवारीच्या भेटीगाठी घेऊन प्रचार सुरू आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात जळगाव शहराचा समावेश आहे. त्यामुळे जळगाव शहर हे मतदानाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. २०१४ पर्यंत जळगाव लोकसभा मतदारसंघातून सात वेळा निवडणूक लढवून निवडून येणाऱ्या माजी मंत्री सुरेश दादा जैन यांचे जळगाव शहराशी घट्ट नाते जुळले आहे.

जळगाव शहर आणि सुरेश दादा जैन हे एक समीकरणच निर्माण झाले होते. २०१४ साली विधानसभेची निवडणूक सुरेश दादांनी तुरुंगातून लढवली आहे. त्यात ते पराभूत झाले. त्यांच्या पराभवानंतर तब्बल दहा वर्षात जळगाव शहराच्या विकासाच्या संदर्भात शहरवासीयांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आणि जळगाव शहराच्या विकासाची वाट लागली. जळगाव शहराच्या विकासासाठी जळगावकरांना सुरेश दादा जैन हवेत. सुरेश दादांच्या स्वप्नातील जळगाव शहर निर्माण होणे राजकारण्यांना परवडणारे नव्हते. म्हणून राजकीय षडयंत्र रचण्यात आले. त्या राजकीय षड्यंत्रातून जळगाव आणि शहराचे भले तर झाले नाहीच; उलट जळगाव शहराचा सत्यनाश झाला असेच म्हणावे लागेल.

असो.. घाणेरडे राजकारणाला कंटाळून आता राजकारणापासून दूर झालेले सुरेश दादा २०२४ च्या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार? याकडे भाजपसह विरोधी पक्षांचे लक्ष लागून आहे. कालच जळगाव शहराच्या लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी सुरेश दादा जैन यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांच्या समावेत त्यांच्या कन्या तथा भाजपच्या प्रदेश महिला युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष भैरवी पलांडे या देखील उपस्थित होत्या. स्मिता वाघ यांनी सुरेश दादांची भेट लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतली, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. जवळपास तासभर झालेल्या या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात जळगाव शहराच्या विकासाच्या मुद्द्यावरही चर्चा झाली.

जळगाव शहराच्या विकासासंदर्भात सुरेश दादा जैन यांची एक स्वतंत्र कल्पना आहे. त्यामुळे सुरेश दादांच्या अनुभवाच्या अनेकांना फायदा होऊ शकतो. स्मिता वाघ यांनी सुद्धा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एकनिष्ठ कट्टर कार्यकर्त्याची भूमिका त्यांनी पार पाडली आहे. जिल्हा परिषदेच्या पहिला महिला अध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरी पार पाडले आहे. त्यानंतर विधानसभा परिषदेवर आमदार म्हणून झालेली त्यांची निवड म्हणजे त्यांच्या कार्याची जणू पावतीच म्हणता येईल. २०१९ च्या विधानसभेसाठी पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतर २०२४ साली त्यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने त्यांना फार मोठी सहानुभूती मिळालेली आहे. निवडणूक प्रचाराचा एक भाग म्हणून स्मिता वाघ यांनी सुरेश दादा जैन यांची घेतलेल्या भेटीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहेत.

जळगाव शहरात अनभिषिक्तपणे राज्य करणारे अथवा ‘जळगाव शहर म्हणजे सुरेश दादा जैन यांच्या गळ्यातले ताईत’ अशी ओळख असलेल्या सुरेश दादा जैन यांनी सध्या वयोमानानुसार तसेच प्रकृती अस्वास्थ्यामुळे सक्रिय राजकारणापासून स्वतःला दूर सारले आहे. आपल्या राजकीय कारकीर्दीत जळगावच्या विकासाच्या आड येणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षांशी त्यांनी कधी तडजोड केली नाही. राजकारणाला काँग्रेस पक्षापासून सुरुवात झाली असली तरी त्यांनी काँग्रेस, एस काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना असे पक्ष बदल केले.

जळगाव शहराच्या विकासाच्या आड येणाऱ्या कोणत्याही पक्षाशी त्यांनी तडजोड केली नाही. त्यांनी कोणत्याही पक्षाबरोबर तडजोड केली असती, तर राजकारणात त्यांना अनेक मोठी पदे मिळवता आली असती. परंतु त्यांनी पदा ऐवजी शहराचा विकास महत्त्वाचा मानला. त्यातून झोपडपट्टी मुक्त जळगाव शहर, गरिबांना पक्की घरे देणे, नगरपालिकेची देशातील पहिली १७ मजली प्रशासकीय इमारत, जळगाव शहराला आगामी ५० वर्षे पिण्याचे पाणी मिळेल अशी वाघुर पाणीपुरवठा योजनेची निर्मिती, जळगावला आंतरराष्ट्रीय विमानतळाची निर्मिती आणि जळगाव शहर स्वच्छ, सुंदर, हिरव्यागार करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या या नेत्याच्या स्वप्नाचा गलिच्छ राजकारण्यांनी चुरडा केला. तथापि आज त्यांची जळगावकरांना आठवण येते आहे. जळगाव शहरातील गुन्हेगारी गुंडगिरी मोडून काढण्यात सुरेश दादांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे सुरेश दादांनी लोकसभा निवडणुकीत कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. विरोधी पक्षाचे उमेदवार सुद्धा सुरेश दादांची भेट घेतील. प्रत्यक्षात ते कोणत्या पक्षाकडे आपला कल देतील हे महत्त्वाचे ठरणार आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.