मन की बात (दीपक कुलकर्णी)
राजकारणात कधी काय होईल याचा भरवसा राहिलेला नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांनी ‘मी पुन्हा येईल’ अशी गर्जना केली; ते बहुमतात आलेही मात्र सत्तेपासून त्यांना लांब रहावे लागले. ‘केंद्रात नरेंद्र… राज्यात देवेंद्र’ अशीही घोषणा त्यावेळी फार चालली मात्र केंद्रात नरेंद्र आले मात्र राज्यात देवेंद्र काही आले नाही. काळ पुढे जात राहिला तसे समीकरण देखील बदलत गेले. अडीच वर्षांनी देवेंद्र आले ते ही दोन पक्ष फोडून…राजकारणातील व्यक्तीला सत्तेशिवाय करमत नाही हे खरे आहे. एकदा राजकारणात पाऊल ठेवले की त्याला खुर्ची हवीच असते. आता बघा जळगाव लोकसभा मतदारसंघातही खुर्चीचा खेळ सुरु झाला आहे. भाजपने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा पत्ता कट केला असला तरी ते आपली खुर्ची वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत. उन्मेष पाटील हे देशातील टॉप टेन खासदारांपैकी एक आहेत. तरीही भाजपने त्यांचा पत्ता कट करण्याची जोखीम पत्कारली आहे.
उन्मेष पाटील यांच्याविरोधात पक्षांतर्गत गट अधिक सक्रीय झाल्याने श्रेष्ठींनी त्यांना घरचा रस्ता दाखविला असला तरी उन्मेष पाटील स्वत:ची वाट शोधत आहेत. तत्कालीन खासदार ए.टी. नाना पाटील हेही भाजपपासून असेच दूर गेले असतांनाही त्यांना जवळ घेण्याचा साधा प्रयत्नही भाजपने केला नाही. तोच कित्ता उन्मेष पाटील यांच्याबाबतीत भाजप गिरवित असला तरी त्यात जोखीम जास्त आहे. उन्मेष पाटील यांच्या आमदारकी व खासदारकीच्या काळात बहुतांश कामे मार्गी लागल्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाल्यानेच त्यांना जवळ घेण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांची शिवसेना करीत आहेत. प्रत्येक राजकारण्याला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात तसाच निर्णय उन्मेष पाटीलही घेवू शकतात.
भाजपने महिला कार्ड समोर करुन स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्याने त्यांच्या विरोधात महिला उमेदवार देण्यावर उद्धव सेनेचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न करीत असतांना उद्धव सेनेसमोर काही महिलांची नावे समोर असून त्यात उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा यांचेही नाव वरती आहे. अमळनेरच्या ॲड. ललिता पाटीलही उमेदवारीसाठी ‘मातोश्री’च्या घिरट्या घालत आहेतच. खासदार उन्मेष पाटील हेही राजकारणात मुरब्बी असल्याने ते सावध पाऊले उचलत आहेत. देवेंद्र फडणवीसांप्रमाणे तेही ‘पुन्हा येईल’ अशी गर्जना करु शकतात. शेवटी काय तर राजकारणात सक्रीय राहण्यासाठी कुठलातरी पक्ष हाताशी ठेवणे गरजेचे आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदेंची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपच्या खेळीकडे टकामका बघत आहे. त्यांच्यातील काही लोकांचा स्मिता वाघ यांच्या उमेदवारीला विरोध आहे हे लपून राहिलेले नाही मात्र ते समोर येत नाही एवढेच ! एकेकाळी निष्ठावंत असल्याची कोल्हेकुई करणारे पदाधिकारी क्षणात सरड्यासारखे रंग बदलवून सोयीस्करपणे पक्षाचा झेंडा हाती घेतात. कार्यकर्त्यांनाही त्यांच्या या पक्ष बदलाचा तिटकारा येतो मात्र कार्यकर्ते बिचारे करणार तरी काय?
एकंदरीत काय तर राजकारणात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रत्येकाला प्रयत्नांची पराकाष्टा करावीच लागते. कार्यकर्त्यांची फळी आणि व्हिजन डोळ्यासमोर ठेवून निवडणुकांच्या मैदानात उतरावे लागत असून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी ‘मी पुन्हा येईन’ अशी गर्जनाही करावीच लागते.