उज्ज्वल निकम लोकसभेच्या रिंगणात ?

काँग्रेसने उमेदवार देताच भाजपचेही ठरले : उत्तर मध्य मतदारसंघासाठी उमेदवारी

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क 

उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता महायुतीदेखील उमेदवाराची घोषणा करण्याच्या तयारीत आहे. भाजपने गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या सर्व जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. पण उत्तर मध्य मुंबईत भाजपने अद्याप तरी उमेदवार दिलेला नाही. 2014 पासून पूनम महाजन इथल्या खासदार आहेत. पण त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने मुंबईत तीन जागा जिंकल्या. यातील दोन जागांवर भाजपने उमेदवार दिले आहेत. विद्यमान खासदारांची तिकिट कापण्यात आली आहेत. त्यानंतर आता पूनम महाजन यांचे तिकीट कापले जाण्याची दाट शक्यता आहे. भाजप इथून ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना तिकीट देण्याची दाट शक्यता आहे.

उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, अभिनेता सचिन खेडेकर यांची नावे चर्चेत होती. भाजपने 8 ते 10 दिवसांपूर्वी निकम यांच्याशी संपर्क साधला होता. उत्तर मध्यसाठी त्यांना विचारणा करण्यात आली होती. त्यांनी भाजपला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. निकम यांचा चेहरा सुपरिचित आहे. ते ज्येष्ठ विधीज्ञ आहेत. त्यामुळे भाजपने निकम यांना लोकसभेसाठी विचारणा केली होती.

उज्ज्वल निकम मूळचे जळगावचे आहेत. पण त्यांची कर्मभूमी मुंबई राहिली आहे. मुंबईशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. मुंबईत 1993 मध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोट असोत वा 26/11 चा दहशतवादी हल्ला, निकम यांनी महत्त्वाचे खटले हाताळले आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी ते सुपरिचित चेहरा आहेत. निकम यांच्या नावाची घोषणा करू शकतात. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली आहे. गायकवाड या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्या मंत्री होत्या. उत्तर मध्य मुंबईत महायुतीची चांगली ताकद आहे. या मतदारसंघात विधानसभेच्या सहा जागा येतात. इथे शिंदेंच्या शिवसेनेचे आणि भाजपचे प्रत्येकी 2 आमदार आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.