मोदींची मोठी घोषणा: ED ने जप्त केलेली संपत्ती गरिबांमध्ये वाटणार

0

पश्चिम बंगाल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मागील काही वर्षांपासून ईडीने मोठ्या प्रमाणावर धाडी टाकून कारवाई केली आहे. यावरून विरोधक नेहमी  केंद्र सरकारवर टीका करतात. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक मोठे वक्तव्य केले. पश्चिम बंगालमधील गरिबांकडून लुटलेला आणि अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केलेला पैसा लोकांना परत करणार, असे वक्तव्य पीएम मोदींनी केले आहे.

कृष्णनगर लोकसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांच्या विरोधात भाजपने राजघराण्यातील सदस्य अमृता रॉय यांना उमेदवारी दिली आहे. आज पीएम मोदींनी अमृता यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी पीएम मोदी म्हणाले, ईडीने पश्चिम बंगालमध्ये 3000 कोटी रुपये जप्त केले आहेत. हा गरिबांचा पैसा आहे. कोणी शिक्षक होण्यासाठी पैसे दिले, तर कोणी कारकून होण्यासाठी पैसे दिले. माझी इच्छा आहे की, नवीन सरकार बनताच गरीब जनतेचा पैसा त्यांना परत केला जावा. यासाठी मी कायदेशीर सल्ला घेतोय. बंगालच्या लोकांनी विश्वास ठेवावा की, ईडीने जप्त केलेले 3000 कोटी रुपये परत करण्यासाठी भाजप सरकार काही ना काही मार्ग शोधेल.

पंतप्रधान मोदी आणि अमतृा रॉय यांच्यातील चर्चेची माहिती देताना भाजप नेत्यांनी सांगितले की, राज्यात नोकऱ्या देण्यासाठी तृणमूलने सुमारे 3,000 कोटी रुपये लाटले. पंतप्रधान मोदींनी राजमाता अमृता रॉय यांना सांगितले की, भ्रष्टाचाऱ्यांनी सर्वसामान्यांचा पैसा लुटला आहे, सध्या हा पैसा ईडीकडे आहे. तो गरीब जनतेला परत केला पाहिजे. यासाठी ते कायदेशीर पर्याय शोधत आहे. एकीकडे भाजप देशातून भ्रष्टाचार उखडून टाकण्यासाठी कटिबद्ध आहे, तर दुसरीकडे सर्व भ्रष्टाचारी एकमेकांना वाचवण्यासाठी एकत्र आले आहेत. पश्चिम बंगालमधील जनता परिवर्तनासाठी मतदान करेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.