‘सबका साथ सबका विकास’ हेच एकमेव ध्येय : स्मिताताई वाघ

लोकशाही समूहाला सदिस्च्छ भेट

0

जळगाव, लोकशाही न्यूज 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेवर आधारीत ‘सबका साथ सबका विकास’ या विषयाला धरुनच आगामी काळात काम केले जाणार असून शेवटच्या घटकापर्यंत केंद्र सरकारच्या योजना पोहचविण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी दिली. रविवारी सकाळी वाघ यांनी लोकशाही समूहाला भेट देवून संसाद साधला.

जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार या नात्याने त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. 1984 पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची निर्मिती व्हावी यासाठी जनआंदोलन उभारण्यात आले. 12 हजार युवकांचा सहभाग असलेल्या ‘युवा संकल्प’ अधिवेशनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. 1991 पासून राजकीय क्षेत्रात प्रवेश करीत भाजपा कार्यकारिणी सदस्यापासून विधानपरिषदेच्या सदस्यापर्यंत काम करण्याची संधी भाजपाने दिली. 2002 पासून सलग तीन टर्म जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाची सेवा केली. जिल्ह्यातील अंगणवाड्यांची दुरावस्था दूर करण्यासाठी त्याकाळात मोठे काम केले. जिल्ह्यात अंगणवाड्यांचे जाळे पोहचवून शैक्षणिक स्तर उंचावला गेला.

शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील भारत निर्माण करण्यासाठी ‘सबका साथ सबका विकास’ हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून कामाला सुरुवात केली आहे. लोकसभेत संधी प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील विकासाला चालना देण्यासाठी प्राधान्याने काम करण्यात येणार आहे. बेरोजगारांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रीत करुन त्यांना काम देणे, दळणवळणाच्या सुविधा अधिक सुखकर करण्यावर भर राहणार आहे. रोजगार, शेती, सिंचन, उद्योग, रस्ते, वीज या मुलभूत गरजांवर मोठे काम करण्याची संधी आहे. बचत गटाच्या महिलांना मोदीजींच्या दूरदृष्टीतून मोठ्या प्रमाणावर भांडवल उपलब्ध करुन दिले जात असल्याने ग्रामीण भागात छोटे-मोठे उद्योग निर्माण झाले आहेत. शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली जाईल.

पाडळसरेचा प्रस्ताव केंद्र दरबारी पोहचविला

अमळनेरसह पाच तालुक्यांना संजीवनी ठरणाऱ्या पाडळसरे प्रकल्पाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव जाणे महत्त्वाचे होते. तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव तयार करुन त्याला देवेंद्र फडणवीस यांनी आकार दिला आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रस्तावाला मान्यता दिल्याने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे. मध्यंतरीच्या काळात राज्यात सत्ता नसल्यामुळे त्याला खिळ बसली मात्र देवेंद्र फडणवीस हे जल खात्याचे मंत्री झाल्यानंतर पुन्हा मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला. पाडळसरेचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या दरबारात पोहचविण्याचे काम आपल्या हातून झाल्याचा आनंद आहे.

अमृत योजनेमुळे रस्त्यांची दुरावस्था

जळगाव शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, हे खरे असले तरी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा अमृत योजनेला चालना देण्यासाठी रस्ते फोडले गेले. पुढील 50 वर्षांचा विचार करुन अमृत योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे रस्ते खराब झाले तर ते पुन्हा दुरुस्त होतील मात्र पाण्याची समस्या कायम स्वरुपी सुटणार आहे हे महत्त्वाचे आहे. शहरातील रस्ते लवकरच चांगले होतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

कुटुंबाचा विश्वास… समाजसेवेचा ध्यास

सुरुवातीपासून पती उदय वाघ यांनी प्रोत्साहन दिले; त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात मला पुढे करुन समाजसेवेची संधी उपलब्ध करुन दिली. कुटुंबाचा माझ्यावर विश्वास असल्यामुळेच मी समाजसेवेचा ध्यास घेतला. एका खेड्यातून आलेली महिला विविध पदे भूषविणे हे कुटुंबाच्या पाठबळामुळेच शक्य झाले आहे. आज स्व. उदय वाघ आपल्यात नसले तरी त्यांचे समाजसेवेचे काम पुढे घेवू जाणे हाच अजेंडा आहे.

यावेळी लोकशाही समूहातर्फे संचालिका शुभांगी यावलकर यांच्या हस्ते स्मितातताई वाघ यांना शाल, स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. या प्रसंगी संचालक राजेश यावलकर, सल्लागार संपादक धों. ज. गुरव, व्यवस्थापक सुभाष गोळेसर, उपसंपादक दीपक कुळकर्णी, जाहिरात व्यवस्थापक विवेक कुळकर्णी व सहकारी उपस्थित होते.

जनतेचा मोदींवर विश्वास

देशातील तमान जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दृढविश्वास असून त्यांनी प्रत्येक क्षेत्राला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. युवक, विद्यार्थी, शेतकरी, महिला, कष्टकरी यांच्या समस्या सोडविण्यावर ते साततत्याने काम करीत असून त्यांच्या या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यावर आपण भर देणार असून आगामी निवडणुकीत जनता मोदीजींवर विश्वास ठेवून मोठे मताधिक्क्य देईल असा विश्वास  वाघ यांनी व्यक्त केला.

नाराज कार्यकर्त्यांची भेट घेणार

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोशल मीडीयात काही लोकांनी नाराजीचा सूर आवळला असला तरी भाजपाचे कार्यकर्ते आदेशाचे पालन करतात. कुठेही नाराजी नाही; मात्र काही लोक नाराज असतील तर त्यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांचे समाधान केले जाईल. गत काळात माझी उमेदवारी रद्द करण्यात आली होती परंतु आपण पक्षाचे काम करीत राहिलो. त्याचे हे फळ आहे. खासदार उन्मेष पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेतली असून ते प्रचारात सहभागी होणार असून त्यांचीही काही नाराजी नाही असे वाघ यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.