मोहम्मद सिराजचा कहर; अवघ्या ५५ धावांवर आफ्रिकेचा संघ तंबूत…

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून केपटाऊनमध्ये सुरू झाला आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा मोहम्मद सिराजने अक्षरशः कहर केला. डाव सुरू होताच मोहम्मद सिराजने आपला तोच फॉर्म दाखवला ज्यासाठी तो ओळखला जातो. दक्षिण आफ्रिकेचा एकही फलंदाज सिराजसमोर टिकू शकला नाही. त्याच्या घटक गोलंदाजी मुळे दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ केवळ 55 धावांवर तंबूत परतला. सिराजने एकाच सत्रात केवळ 5 नाही तर 6 विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराहने २ तर मुकेश कुमारने २ बळी घेतले.

दक्षिण आफ्रिकेची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी…

आपला शेवटचा कसोटी सामना खेळत असलेला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही सलामीवीर लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतल्याने त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला. संघाची धावसंख्या केवळ 5 धावांवर असताना अॅडम मार्कराम दोन धावा करून बाद झाला. कर्णधार डीन एल्गरही चार धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यावेळी संघाची धावसंख्या फक्त आठ धावा होती. मोहम्मद सिराजने या दोन्ही सलामीवीरांना आपला बळी बनवले. यानंतर जसप्रीत बुमराहने तिसऱ्या विकेटसाठी त्रिस्टन स्टब्सला तीन धावांवर बाद करत दक्षिण आफ्रिकेला धक्का दिला.

मोहम्मद सिराजने सलग 9 षटके टाकली

त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने जसप्रीत बुमराहला काढून प्रसीदला गोलंदाजीसाठी बोलावले. मात्र मोहम्मद सिराजने दुसऱ्या टोकाकडून सातत्याने गोलंदाजी केली. तीन विकेट घेतल्यानंतर आणखी तीन विकेट्स त्याने आपल्या नावावर केल्या. मोहम्मद सिराजने एका टोकाकडून सलग नऊ षटके टाकली आणि सहा विकेट घेतल्या. या काळात त्याने केवळ 15 धावा दिल्या.

सिराजने तिसऱ्यांदा कसोटीत 5 विकेट घेतल्या

मोहम्मद सिराजने कसोटी डावात ५ बळी घेण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी त्याने केवळ पाच विकेट घेतल्या होत्या, यावेळी हा आकडा थेट सहावर पोहोचला आहे. सिराजची त्याच्या छोट्या कसोटी कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी, सिराजने 2021 मध्ये ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 73 धावांत पाच विकेट घेतल्या होत्या. मागच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 60 धावांत 5 बळी घेतले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.