‘श्रीरामां’मुळे राष्ट्रवादीत ‘असंतोष’ !

0

मन की बात (दीपक कुलकर्णी)

आज ठरणार उद्या ठरणार असे करीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अखेर ठरला असला तरी यामुळे महाविकास आघाडीमध्येच बिघाडीची शक्यता अधिकतेने निर्माण झालेली आहे. आज माध्यमांसमोर आलेल्या फॉर्म्युल्यानुसार उद्धव ठाकरे यांची शिवसेना ‘मोठा भाऊ’ ठरली असून त्यांनी तब्बल 21 जागा पदरात पाडून घेतल्या आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला केवळ दहा जागा तर राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला सतरा जागांवर समाधान मानावे लागले आहे. महाविकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या या निमित्ताने वाढली असली तरी ती पक्षश्रेष्ठींसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

जळगाव लोकसभा मततदारसंघ उबाठा गटाला मिळाला असून त्यांनी उमेदवाराची घोषणाही करुन टाकली आहे; तर रावेरची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडल्यामुळे ते  नव्या उमेदवाराच्या शोधात दिसत आहेत. शरद पवार गटाकडून भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील व उद्योजक श्रीराम पाटील यांनी इच्छा व्यक्त केली असली तरी उद्योजक श्रीराम पाटील आघाडीवर दिसून येत आहेत. त्यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शरद पवारांची भेट घेवून राष्ट्रवादीत प्रवेश देखील घेतला आहे. मतदारसंघातील परिस्थिती पाहता भाजप उमेदवार रक्षा खडसे यांना शह देण्यासाठी श्रीराम पाटील योग्य ठरु शकतात. मराठा चेहरा असलेले श्रीराम पाटील हे उद्योजक असले तरी त्यांचा राजकारणाची अलीकडे जवळचा संबंध निर्माण झालेला आहे. सुरुवातीला श्रीराम पाटील हे विधानसभेसाठी तयारी करीत होते; मात्र राष्ट्रवादी उमेदवाराचा शोध घेत असल्याची कुणकुण त्यांना लागली आणि त्यांनी तडक राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतली असली तरी त्यांचा राजकीय प्रवेशाची वाट सर्वच पक्षांमधून जाते.

श्रीराम पाटील हे आधी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार होते. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तारीख सुद्धा निश्चित केली होती; मात्र ऐन वेळेस अजित पवार यांचा दौरा रद्द झाल्याने श्रीराम पाटील यांचा प्रवेश हुकला. त्यानंतर त्यांना कमळाचा सुगंध येवू लागल्याने फेब्रुवारी महिन्यामध्ये भाजपत प्रवेश केला. गिरीश महाजन हे आपले नेते आहेत असे सांगणारे श्रीराम पाटील आज राष्ट्रवादीत  दाखल झालेले आहे. हा त्यांचा प्रवेशाचा मार्ग केवळ आणि केवळ उमेदवारीसाठीच होता हे अधोरेखित झालेले आहे. गेल्या महिन्यात भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनीही शरद पवार यांची भेट घेवून उमेदवारी आपल्यालाच मिळेल अशी तुतारी फुंकली आणि भुसावळात मिरवणूकही काढली. संतोष चौधरी यांचे नाव त्यावेळी आघाडीवर आल्याने ॲड. रवींद्र पाटील यांनी त्याला पडद्यामागून विरोध करण्यास सुरुवात केली आणि उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले. आता तर उद्योजक श्रीराम पाटील हे उमेदवारीच्या सर्व परिक्षांमध्ये पास झाल्याने त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता अधिकच बळावली आहे.

राष्ट्रवादीतील पक्ष नेतृत्व एकनाथ खडसे परिवाराला उमेदवारी देण्यासाठी इच्छुक होते, मात्र आता खुद्द एकनाथ खडसे स्वगृही म्हणजे भाजपत जात असल्याने हा विषय राष्ट्रवादीने थांबवला आहे. ॲड. रोहिणी खडसे ह्या आज जरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असल्या तरी त्यांच्या तेथे राहण्यावर श्रेष्ठींचा विश्वास राहिलेला नाही. रोहिणी खडसे केव्हाही वडीलांच्या छत्रछायेखाली जावू शकतात या भितीने राष्ट्रवादी सावध झालेली आहे. पक्ष कुठलाही असो उमेदवारी वरुन नाराजीनाट्याची सुरुवात होतच असते. एकंदरी काय तर रावेर लोकसभा मतदारसंघात सध्या तरी ‘श्रीरामां’मुळे ‘असंतोष’ अशीच स्थिती निर्माण झालेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.