मला राजकारणात यावेस वाटत नव्हते, पण..!

शाहू महाराज यांचे वक्तव्य

0

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

साधारण वर्षभरापूर्वी मी प्रत्यक्ष राजकारणात नव्हतो. पण मी कायम राजकीय मैदानाच्या वेशीवर उभा होतो. त्या दृष्टीकोनातूनच मी विचार करायचो. पण कोल्हापूरात सगळेजण आपापले काम करत होते. सगळे चांगले सुरु होते. त्यामुळे वर्षभरापूर्वी मला राजकारणात येण्याची आवश्यकता वाटत नव्हती. पण कदाचित आता ती वेळ आली असेल, असे वक्तव्य छत्रपती शाहू महाराज यांनी केले. छत्रपती शाहू महाराज यांना काँग्रेसकडून कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचे आभार मानले.

यावेळी शाहू महाराजांना तुमचा निवडणुकीच्या मैदानात न उतरण्याचा वर्षभरापूर्वीचा निर्णय अचानक बदलला कसा, असे विचारण्यात आले. यावर शाहू महाराजांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, मी स्वत:ला फार महत्त्व देऊ इच्छित नाही. पण वर्षभरापूर्वीचा माझा राजकारणात न उतरण्याचा माझा निर्णय मला बदलावा लागला. तेव्हा मला राजकारणात उतरण्याची आवश्यकता वाटत नव्हती. पण आता जनतेला वाटत असेल की, आपण एका स्तरावर आलो आहोत, जिथे माझी आवश्यकता आहे. हीच वेळ महाराजांनी लक्ष घालण्याची आहे, असे जनतेला वाटत असावे. त्यामुळे मी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे शाहू महाराजांनी सांगितले.

आपल्या महाराष्ट्राला आणि कोल्हापूरला मोठा इतिहास आहे. हा इतिहास छत्रपती शिवरायांपासून सुरु होतो. त्यांनी केलेले कार्य, त्या काळात त्यांनी समाजाला दिलेली दिशा, अन्यायाविरोधात त्यांचा लढा आणि सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी केलेले काम, या सगळ्याचा आदर्श आपल्यासमोर आहे. आधुनिक काळात शाहू महाराजांनी समता आणि शिक्षणाच्यादृष्टीने महत्त्वाचे कार्य केले. तोच विचार कोल्हापूरच्या जनतेमध्ये रुजला आहे. याशिवाय, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचासरणीचा प्रभाव आहे. हाच विचार पुढे नेण्याचं काम मी करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.