उज्जैनच्या महाकाल मंदिरात अग्नितांडव, पुजाऱ्यासह 13 जण होरपळले (व्हिडीओ)

0

उज्जैन, लोकशाही न्यूज नेटवर्क 

उज्जैनच्या महाकाल मंदिरात आज सकाळी भस्म आरती सुरू असताना मोठा अपघात झाला. आरतीवेळी मंदिरात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचवेळी गुलालाची उधळण होताच आग लागली. या आगीत मुख्य पुजाऱ्यासह 13 जण होरपळले. त्यांच्यावर  रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरतीदरम्यान गुलाल उधळल्याने अचानक भीषण आग लागल्याची माहिती मिळाली. सुदैवाने आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आलं. महाकाल मंदिरातील भस्मारतीचे मुख्य पुजारी संजय गुरु, विकास पुजारी, मनोज पुजारी, अंश पुरोहित, सेवक महेश शर्मा आणि चिंतामण गेहलोत यांच्यासह अनेक जण जखमी झाले.

उज्जैनचे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिरात भस्म आरतीच्या वेळी गुलालही वापरला जातो. आज भस्म आरतीदरम्यान गर्भगृहात कापूरही पेटवण्यात आला, त्यातच गुलाल उधळण्यात आला. ज्यामुळे अचानक भीषण आग लागली आणि आरतीसाठी उपस्थित असलेल्यांपैकी 13 जण होरपळले. त्यामध्ये मंदिरातील पुजाऱ्यांचाही समावेश आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झालेलं नाही. सर्वांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत लक्ष ठेवून आहेत. या घटनेनंतरही मंदिरात दर्शन व्यवस्थित सुरू असून, तेथे कोणतीही समस्या अथवा अडचण निर्माण झालेली नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

https://x.com/ANI/status/1772091759146815912?s=20

आगीची ही घटना घडली तेव्हा जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिरात हजारो भाविकांची उपस्थिती होती. सर्वजण होळीनिमित्त दर्शनासाठी आले होते. गर्भगृहात पुजारी आरती करत होते, तेवढ्यात मागून कोणीतरी गुलाल उधळला, तो दिव्यावर पडला आणि आग लागली. त्या गुलालमध्ये केमिकल असल्याने आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गर्भगृहाच्या भिंती आणि छतावर चांदीचा लेप लावण्यात आला आहे. होळीच्या दिवशी बाबा महाकालला गुलाल अर्पण केला जातो आणि पुजारीदेखील एकमेकांना रंग लावतात. मात्र हे रंग लागून गर्भगृहाच्या भिंती खराब होऊ नयेत यासाठी यंदा फ्लेक्स लावण्यात आले होते. मात्र गर्भगृहात एकमेकांवर गुलालाच वर्षाव होत असताना तो गुलाल आरतीच्या ताटातील कापूरावर उधळला आणि कापूरने पेट घेतल्याने आग लागली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.