राज्यातील सत्तासंघर्षाचा ऐतिहासिक निकाल उद्याच लागणार… TV वर होणार थेट प्रक्षेपण!

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

महाराष्ट्रात गेल्या वर्षी झालेल्या राजकीय उलथापालथी आणि सत्ताबदलाबाबत उद्या मोठा निर्णय येऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, खंडपीठ उद्या या प्रकरणी निकाल देण्याची शक्यता आहे. घटनापीठात सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती एमआर शाह, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांचा समावेश होता.

या प्रकरणी खंडपीठाने १७ फेब्रुवारीपासून विविध याचिकांवर सुनावणी सुरू केली. त्यानंतर १६ मार्च रोजी सुनावणी पूर्ण करताना न्यायालयाने याप्रकरणी निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल, हरीश साळवे, महेश जेठमलानी आणि अधिवक्ता अभिकल्प प्रताप सिंह यांचा युक्तिवाद ऐकला. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या प्रकरणी राज्यपाल कार्यालयाची बाजू मांडली. दुसरीकडे, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत आणि अधिवक्ता अमित आनंद तिवारी यांनी महाविकास आघाडीच्या वतीने युक्तिवाद केला.

उद्धव गटाच्या वतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करताना राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट घेण्याचे आदेश रद्द करावेत, असे म्हटले होते. जून 2022 चा राज्यपालांचा निर्णय लोकशाहीसाठी घातक असून देशाच्या लोकशाही व्यवस्थेसाठी घातक असल्याचे उद्धव गटाने म्हटले होते. यादरम्यान न्यायालयाने म्हटले होते की, राज्यपाल आपल्या कार्यालयाचा वापर कोणत्याही विशिष्ट निकालासाठी करू देऊ शकत नाहीत.

संपूर्ण महाराष्ट्र सहित अवघ्या देशाला उत्सुकता लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार असल्याची बातमी आहे. आणि या निकालाचं उद्या कोर्टातून लाईव्ह स्ट्रीमिंगही होणार आहे. त्यामुळे जनतेला हा अतिशय ऐतिहासिक असा निकाल लाईव्ह पाहता येणार आहे. कोर्टाचा निकाल थेट टीव्हीवरुन पाहण्याची ही पहिलीच वेळ असेल. कोर्टात नेमकं काय सुरु आहे, न्यायाधीश निकाल कसं वाचणार हे जसंच्या तसं जनतेला टीव्हीवर पाहता येणार आहे. हा निकाल ऐतिहासिक असल्याने जनतेला थेट कोर्टात सुरु असलेलं निकालाचं वाचन जसंच्या तसं पाहता येणार आहे. सुप्रीम कोर्टाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची ही पहिली अशी केस असेल की जनतेला कोर्टाचं निकाल वाचन थेट टीव्हीवर पाहता येणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.