दिल्लीत वेटिंग, शहांसोबत मीटिंग, मग साताऱ्यात एन्ट्री; तरीही उदयनराजेंची उमेदवारी लटकली?

0

सातारा ;- महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. महायुतीचे खासदार नसलेल्या जागांवरुन रस्सीखेच सुरू आहे. भाजपकडून राज्यसभेवर गेलेल्या उदयनराजे भोसले यांना पुन्हा साताऱ्यातून लोकसभेची निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहांची भेट घेतली. या भेटीसाठी उदयनराजेंना दोन दिवस प्रतीक्षा करावी लागली. शहांना भेटून साताऱ्यात परतल्यानंतर उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले; मात्र भाजपने अद्यापही उदयनराजेंना तिकीट जाहीर केलेले नाही.

महायुतीमधील अंतर्गत वादांमुळे उदयनराजेंची उमेदवारी लटकल्याचे बोलले जात आहे. साताऱ्याची जागा 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली. उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाले. पण काही महिन्यांमध्येच त्यांनी राजीनामा दिला. ते भाजपमध्ये गेले. त्यानंतर साताऱ्यात पोटनिवडणूक झाली. भाजपने उदयनराजे भोसलेंना तिकीट दिले. पण राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा पराभव केला. पाटील सध्या शरद पवारांसोबत आहेत. गेल्या निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादीने जिंकल्याने साताऱ्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे.

उदयनराजे भोसले साताऱ्यातून निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत. पण अजित पवार सातारा सोडण्यास तयार नाहीत. सातारची जागा सोडायची असल्यास त्याबदल्यात नाशिकची जागा द्या, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. नाशिकमध्ये शिंदेसेनेचे हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत. राष्ट्रवादीला छगन भुजबळांसाठी नाशिकची जागा आहे. पण शिंदेसेना ही जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे नाशिकमुळे सातारची जागा अडकली आहे. नाशिकची जागा मिळत नसल्यानं राष्ट्रवादी सातारा मतदारसंघ भाजपला सोडण्यास तयार नाही.

सातारा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास 12 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्याची मुदत 19 एप्रिलला संपेल. उदयनराजे भोसले 18 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. साताऱ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत नाशिकबद्दलची चर्चा झाली. विदर्भात असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी एक ते दोन चर्चा होईल. त्यानंतर सातारा मतदारसंघ भाजपकडे जाईल असं अजित पवार गटाच्या नेत्याने सांगितले

Leave A Reply

Your email address will not be published.