मला तसे मुळीच म्हणायचे नव्हते !

0

टीकेनंतर शरद पवारांचे सुनेत्रांबाबत स्पष्टीकरण

सातारा ;– ‘मी तसे बोललो नव्हतो. अजित पवार यांनी भाषण केले होते, त्यात मला निवडून दिले, लेकीला निवडून दिले, आता सुनेला निवडून द्या, असे सांगून पुढे ते एक वाक्य म्हणाले होते. त्यावर मी प्रतिक्रिया दिली होती,’ असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या विधानावर दिले.
‘या देशात महिला आरक्षणाचा निर्णय राज्यात घेणारा मुख्यमंत्री मी होतो. सरकारी सेवेत विशिष्ट आरक्षण देण्याचा निर्णय मी घेतला. संरक्षण दलात मुलींना सहभागी करून देण्याचा निर्णय मी घेतला. त्यामुळे महिलांना प्रतिष्ठा मिळवून देण्याची काळजी मी घेतली. कारण नसताना एखाद्या शब्दावरून वेगळे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरी तो यशस्वी होणार नाही,’ असेही ते म्हणाले.

राज्यात 70 टक्के जागा जिंकू
‘देशाची सत्ता मागील दहा वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे आणि ते हिशेब मला मागतात. डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वात मी काय काम केले त्याचे उत्तर देऊ शकतो. ‘इंडिया’च्या उमेदवारांना समाजातील सर्व घटकांनी पाठिंबा आहे. मागील निवडणुकीत विरोधकांना एकूण सहा जागा मिळाल्या होत्या. त्यात आम्हाला चार, काँग्रेसला एक, तर एमआयएमला एक अशा जागा होत्या. या निवडणुकीत 60 ते 70 टक्के जागांवर आम्ही विजयी झालो, तर आश्चर्य वाटणार नाही. विशेषतः विदर्भात काँग्रेसला यश मिळेल,’ असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

मोदींची शक्ती कमी करण्याची गरज
‘सध्या नरेंद्र मोदी यांची शक्ती कमी करणे ही देशाची गरज आहे,’ असे पवार यांनी सांगितले. ‘सातारा जिल्ह्यात यशवंतराव चव्हाणांपासून अनेक कर्तृत्ववान लोकांची फळी निर्माण झाली. त्यांच्या विचारांचा पगडा आजही लोकांच्या मनावर आहे. देशातील लोकांना परिवर्तन हवे आहे. त्याचे पहिले पाऊल साताऱ्यातून टाकले आहे. आमच्या लोकांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम सातारकरांनी केले,’ असेही त्यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.