बारामतीत उमेदवार का दिला नाही ? आंबेडकरांचा गौप्यस्फोट

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीबरोबर जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र जागांचा तिढा न सुटल्याने वंचित बहुजन आघाडीने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली. ही भूमिका घेताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये  उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यांच्या या निर्णयाबाबत सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले होते. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.

वंचित बहुजन आघाडीने पुण्यामध्ये वसंत मोरे यांना उमेदवारी दिली आहे. वसंत मोरे यांच्या प्रचारासाठी अद्याप वंचित बहुजन आघाडीचा कोणताही मोठा नेता पुण्यात आलेला नव्हता. याच पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी बारामतीमधून उमेदवार का दिला नाही? याबाबत खुलासा केला आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “बारामतीमध्ये उमेदवार न देण्याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा झाली नव्हती. पण, सुप्रिया सुळे या मला भेटल्या होत्या. आता त्या कुठे भेटल्या याचा वेळ-काळ विचारू नका. हा निर्णय आम्ही भविष्यातील काही राजकीय धोरण लक्षात घेऊन घेतला आहे. काही निर्णय भावूक नाही, तर धोरणाच्या दृष्टिकोनातून घ्यायचे असतात.”

“कोल्हापूरमध्ये छत्रपतींना पाठिंबा देण्याची चर्चा सुरू होती. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माझ्याशी संवाद साधला होता. ते म्हणाले की आमची लढाई मोठी आहे. आमच्या बाजूने तुम्ही आहात, असं दाखवा. त्यामुळे बारामतीमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला,” असे आंबेडकर यांनी सांगितले.  “देशातील तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे दोन टप्प्यांतील मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. भाजपविरोधातील मुद्दे उपस्थित करताना काँग्रेस आणि ठाकरे गट अपयशी ठरले आहेत,” अशी टीका आंबेडकर यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.