मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावलेले असून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. डीएचएफएलशी संबंधित एका प्रकरणात त्यांची चौकशी केली जाऊ शकते, अशी देखील माहिती आहे. आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते उद्या ईडी कार्यालयात जाणार आहेत.
"I will be going to the Enforcement Directorate (ED) office tomorrow," says Shiv Sena leader Sanjay Raut
ED had sent a second summon to Raut, asking him to appear before them on 1st July in connection with the Patra Chawl land scam case. pic.twitter.com/hl5H0SJQz6
— ANI (@ANI) June 30, 2022
दरम्यान, ईडीने आतापर्यंत गैरव्यवहाराच्या रकमेचा माग काढला असता एचडीआयएलकडून प्रवीण राऊतच्या खात्यात सुमारे १०० कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. ही रक्कम पुढे प्रवीण राऊत यांनी त्यांचे जवळचे सहकारी, कुटुंबातील सदस्य, त्यांच्या व्यावसायिक संस्था इत्यादींच्या विविध खात्यांमध्ये वळती केली.
२०१० मध्ये गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेपैकी ८३ लाख रुपये प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी प्रवीण राऊत यांच्याकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षां राऊत यांना मिळाल्याचेही उघड झाले आहे. वर्षां राऊत यांनी ही रक्कम दादर येथे सदनिका खरेदीसाठी वापरली, असा आरोप आहे. तसेच अलिबागमध्येही भूखंड खरेदी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ईडीने काही मालमत्तांवर टाच आणली होती.