छत्रपती संभाजीनगर: – महापालिकेच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील पिवळी वाघीण समृद्धी आजारी होती. किडनी व्यवस्थित कार्य करत नसल्याने तिने अन्न सोडले होते. ती उपचारालाही प्रतिसाद देत नव्हती. चार दिवसांपासून तिला सलाइनद्वारेच पोषक अन्नद्रव्य दिले जात होते. मात्र, आज पहाटे तिने अखेरचा श्वास घेतला.
समृद्धी वाघिणीला दीप्ती आणि गुड्डू या वाघांच्या जोडीने २०१० मध्ये जन्म दिला. त्यानंतर समृद्धी वाघिणीने आतापर्यंत तीनदा दहा बछड्यांना जन्म दिला आहे. गेल्या आठवडाभरापासून समृद्धीचे खाणे कमी झाल्यामुळे ती आजारी पडली. त्यामुळे तिला ४ एप्रिलपासून प्राणी संग्रहालयातील दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले. समृद्धीच्या देखभालीसाठी काळजीवाहक नेमून तिच्यावर २४ तास लक्ष ठेवून होते. माञ तिच्या तब्येतील सुधारणा होत नसल्याचे दिसून आले. यादरम्यान आज पहाटे तीन वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. दुपारी एक ते दीड वाजेदरम्यान प्राणिसंग्रहालयात तिचा अंत्यविधी केला आणार असल्याचे पालिकेने कळवले आहे. वाघांचे आयुष्य सरासरी २० ते २२ वर्षांपर्यंत असते. समृद्धी वाघिण चौदा वर्षांची होती.