रस्त्यांची कामे करतांना वाहतूक खोळंबा होणार नाही याची दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी प्रसाद

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

शहरातील रस्त्यांची कामे करतांना वाहतूक खोळंबा होणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी. यासाठी महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक पोलीस व महावितरण या विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवत काम करावे. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे केल्या.

जळगाव शहरातील नवीन रस्त्यांच्या कामांचा व शहर वाहतूक नियोजनाचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. याबैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, महानगरपालिका शहर अभियंता सी.एस.सोनगीरे, महावितरण कार्यकारी अभियंता जयंत चोपडे, उपअभियंता संजय राठोड, आर.एम.पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.प्रसाद म्हणाले, शहरात सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांची यादी तयार करण्यात यावी. कामे सुरू असलेल्या ठिकाणाची यादी वाहतूक पोलीस विभागालाही देण्यात यावी. याआधारे शहरातील वाहतूकीचे नियोजन करण्यात यावे. एकाच वेळेस सर्व रस्ते बंद करण्यात येऊ नयेत. क्रॉसिंगच्या ठिकाणी लक्ष देण्यात यावे.

अमृत योजनेतील कामे निवडणूकीपूर्वी पूर्ण होतील. याकडे महानगरपालिकेने लक्ष द्यावे. जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद पडणार नाही यासाठी चारही फायबर ऑपटीकल कंपन्यांना प्रस्तावित खोदकाम करण्यात येणाऱ्या रस्त्यांची यादी देण्यात यावी. जेणेकरून खोदकामात वायर तुटणार नाही. महावितरणकडून पोल स्थलांतरणचे काम वेळेत करण्यात यावे.असे ही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरातील रस्ते तसेच इतर कामे करणाऱ्या ठेकेदारांनी अधिकृत रॉयल्टी भरणा केलेल्या गौण खनिजांचा वापर करावा. त्यांच्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आल्याची खात्री करण्यात यावी.अशा सूचना अपर जिल्हाधिकारी श्री.महाजन यांनी दिल्या.

अपघातप्रवण क्षेत्राची यादी तयार करण्यात यावी. मनपा, बांधकाम व पोलीस विभागांनी एकत्रित पाहणी करावी.अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री.प्रसाद यांनी यावेळी दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.