गेहलोत-पायलट वाद… काँग्रेस मोठे बदल करण्याच्या तयारीत…

0

 

राजस्थान, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आल्यानंतर काँग्रेस राजस्थानमध्ये मोठ्या बदलाच्या तयारीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आणि पक्षात एकता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने ‘मोठा बदल’ केला जाईल असे संकेत दिले आहेत. सूत्रांनी सांगितले की या बदलाची वेळ आणि त्याचे स्वरूप अनेक घटकांवर अवलंबून असेल. यात इतर वरिष्ठ नेत्यांचा अभिप्राय आणि राज्यातील राजकीय परिस्थितीचे मूल्यांकन देखील समाविष्ट आहे.

2021 मध्ये पंजाबमध्ये झालेल्या चुकांची पुनरावृत्ती काँग्रेस नेतृत्वाला करायची नाही, असे सूत्रांनी सांगितले. तिकडे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष सोडला आणि स्वतःची संघटना स्थापन केली.

याआधी सचिन पायलट यांनी मंगळवारी राजस्थानच्या अशोक गेहलोत सरकारच्या विरोधात एकदिवसीय उपोषण केले होते. वसुंधरा राजे यांच्या सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांकडे अशोक गेहलोत सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप पायलट यांनी केला आहे. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील तणावावर काँग्रेस नेतृत्व लक्ष ठेवून असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. यामध्ये लवकरच हस्तक्षेप करण्याचा निर्णय पक्षनेतृत्वाने घेतला आहे.

पक्षाचे राजस्थानचे प्रभारी सरचिटणीस सुखजिंदर रंधावा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन त्यांना राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने राजस्थानचे संकट सोडवण्यासाठी आणि पक्षातील एकता बहाल करण्यासाठी मोठे पाऊल उचलले जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, अन्य वरिष्ठ नेत्यांचे मत आणि राज्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन हे मोठे पाऊल उचलले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पायलट यांनी तीन वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात यापूर्वीही मतभेद झाले आहेत. तीन वर्षांपूर्वी सचिन पायलट यांनी बंड केल्यानंतर त्यांना राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.